मुंबईत मोबाइल चोरीच्या घटना वाढत असल्या तरी चोरीचा गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलीस फक्त हरवल्याची तक्रार दाखल करून घेतात. त्यामुळे एखाद्या चोराला पकडल्यानंतर त्याच्याकडील जप्त केलेले मोबाइल कुणाचे आहेत ते समजत नाही. पायधुणी पोलिसांनी दोन सराईत मोबाइल चोरांना पकडले असून त्यांच्याकडून २७ मोबाइल जप्त केले आहेत. मोबाइल चोरीचे गुन्हे दाखल नसल्याने आता या मोबाइलच्या आयईएमआय क्रमांकावरून मोबाइलच्या मालकांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
शहरात मोबाइल चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन पायधुणी पोलिसांनी विशेष कारवाई सुरू केली होती. गुरुवारी पोलिसांनी सापळा लावून मोहम्मद खुर्शिद मनसुती (३०) आणि मोहम्मद मुस्तफा मोहम्मद मुज्जब्बुल रेहमान शाह (२५) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे चोरलेले २७ मोबाइल जप्त करण्यात आले. मात्र मोबाइल चोरीचे गुन्हे दाखल नसल्याने पोलिसांनी या दोघांवर चोरीची मालमत्ता बाळगल्याप्रकरणाचा कलम ४१ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हे मोबाइल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी पोलिसांनी या मोबाइल क्रमांकाचे आयएमआयई क्रमांक प्रसिद्ध केले आहेत. ज्या कुणाचे हे क्रमांक असतील
त्यांनी ते ओळख पटवून घेऊन जावेत असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कवळेकर यांनी केले आहे. मोबाइल दक्षिण मुंबईच्या विविध भागांतून चोरल्याचे या आरोपींनी सांगितले. एखाद्या व्यक्तीचा मोबाइल चोरीला गेल्यावर पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाहीत, अशा तक्रारींवर मोबाइल हरवला तरी चोरीची तक्रार लोक करतात असा युक्तिवाद पोलीस करतात. मोबाइल चोरीच्या प्रत्येक तक्रारीचा गुन्हा दाखल करावा असे आदेश देऊनही पोलीस केवळ मोबाइल हरविल्याचे गहाळपत्र देऊन लोकांची बोळवण करतात. मोबाइल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे त्याचे तपास काम टाळण्यासाठी पोलीस असे गुन्हे दाखल करत नसल्याचे समोर आले आहे.