खून, अत्याचार, प्राणघातक हल्ले नित्याचेच झाले असले तरी आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोटय़वधी रुपयांनी फसवणूक केल्याच्या दोन घटना दोन-तीन महिन्यांत नागपुरात घडल्या आहेत. अशा घटनांना प्रतिबंधात्मक प्रयत्न पोलिसांकडून केले जात नाहीत.
श्री सूर्या तसेच वासनकर इन्व्हेस्टमेंट आदी कंपन्यांनी कोटय़वधी रुपयांना गुंतवणूकदारांची फसवणूक केली. याआधीही अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत. अधिक व्याजाच्या आमिषांना लोक भुलले. तरीही पोलिसांकडून जनजागृती केली जात नाही. काही वर्षांपूर्वी डॉ. भूषणकुमार उपाध्याय गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त असताना रोज जाहिराती वाचून संशयास्पद जाहिरातींची गुन्हे शाखेकरवी शहानिशा केली जात असे. संशयास्पद जाहिरात देणाऱ्याची चौकशी केली जात असल्याने अशा पद्धतीने फसवणूक करण्याची आरोपी हिंमत करीत नव्हते.
अपवाद सोडला तर नागपुरातील बव्हंशी पोलीस अधिकारी विदर्भाबाहेरचे आहेत. कसेतरी दोन वर्षे काढायची, अशी मानसिकता घेऊन आलेल्यांची विदर्भात काम करायची इच्छाच नसते. स्थानिक कायदा व सुव्यस्थेचे त्यांना सोयरसुतक नसते. गुन्हा घडला की तो दाखल करायचा व आरोपींना अटक करायची, व्हीआयपी वा राजकारणी आले की बंदोबस्त एवढेच काम केले जाते. गुन्हा घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय, गुन्हेगारांना धाक बसविणे आदींच्या भानगडीत ते पडत नाहीत. रात्री शहरात अनेक ठिकाणी सर्रास डीजे वाजत असतात. कुठल्याही पोलीस ठाण्याचे निरीक्षक अथवा इतर पोलीस त्यावेळस गस्त घालत नसतात.
गस्तीवर असले तरी त्याकडे दुर्लक्ष करतात. सर्वसामान्य तक्रार करतील व मग कारवाई करू, अशीच भूमिका असेल तर चुकीचे काम करणाऱ्यांना पोलिसांचा धाक तरी कसा राहणार? पोलिसांनी कितीही नाही म्हटले तरी खून, प्राणघातक हल्ले, चेन स्नॅचिंग सातत्याने घडत असल्याने नागरिक धास्तावला आहे.
पोलिसांना काय वाटते..
‘बुरे कामका बुरा नतीजा’ या म्हणीप्रमाणे गुन्हेगारच गुन्हेगारांना मारतात, कौटुंबिक कारणेही खुनांमागे असतात. मानवाधिकाराचे दडपण, अपुरे मनुष्यबळ व त्यामुळे कामाचा ताण, निवासस्थानात अपुऱ्या सोयी आहेत. अनेक पोलीस अधिकारी विदर्भात झालेली बदली रद्द करवून घेतात. खून व इतर घटना वाढत असल्या तरी त्याला सर्वस्वी पोलीसच जबाबदार नाहीत, असे पोलिसांना वाटते.
या संदर्भात बोलताना गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील कोल्हे म्हणाले, ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ ही पोलिसांची जबाबदारी आहेच. त्यांना कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे लागते. विदर्भाबाहेरून बदलून येणाऱ्यांच्या मानसिकतेवर दोषारोपण करण्याऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. शेवटी पोलीसही माणूसच आहे. त्यालाही भाव-भावना असतात. कुटुंबापासून दूर असल्यामुळे त्याला नव्या जागी रुळायला, लोकांमध्ये मिसळायला वेळ लागतो. काही घटनांचा अपवाद सोडला तर सर्वच खून टोळीयुद्धातून झालेले नाहीत. तरीही त्याकडे गांभीर्यानेच पाहिले पाहिजे, कारवाईच्या दृष्टीने कडकच पावले उचलायला हवीत आणि तसे स्पष्ट सांगण्यात आले आहे.
गुन्ह्य़ांचे प्रमाण थोडे वाढत असल्याचे त्यांनी मान्य केले. मनुष्यबळाची कमतरता असली तरी पोलीस चांगलेच करण्याचा प्रयत्न करतात. गुंडांवर हद्दपार, ‘मोक्का’ तसेच विविध कलमान्वये कारवाई केली जाते. देशी कट्टे वा इतर शस्त्रे जप्त केली जातात. गुन्हेगारांवर कारवाई निरंतर केली जाते.
कायदा व सुव्यवस्था राखण्यास पोलीस नेहमीच दक्ष आहेत. गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक नाही, असे म्हणता येणार नाही. गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत जेरबंद करण्यासंबंधी हालचाली सुरू आहेत. एकटे पोलीसच नाही तर नागरिकांचीही काही जबाबदारी आहे. नागरिकांनीही प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत.
नागपूर शहराचा वेगाने विस्तार होत आहे. लोकसंख्याही वाढत आहे. त्यामानाने पोलिसांचे मनुष्यबळ वाढत नाही. गुन्हे घडणारच नाहीत, असे नाही. तरीही त्यावर नियंत्रण मिळविता येऊ शकते, असे कोल्हे यांनी मान्य केले. (उत्तरार्ध)
पोलिसांकडून प्रतिबंधात्मक प्रयत्नांची बोंबाबोंब
खून, अत्याचार, प्राणघातक हल्ले नित्याचेच झाले असले तरी आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोटय़वधी रुपयांनी फसवणूक केल्याच्या दोन घटना दोन-तीन महिन्यांत नागपुरात घडल्या आहेत.
First published on: 08-08-2014 at 03:03 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police did not work to stop fraud incident in nagpur city