राज्यातील टोल नाक्यांवर टोल भरावा लागू नये तसेच वाहतूक पोलिसांचे नसते झंझट मागे लागू नये यासाठी काही खासगी वाहनचालक वाहनांमध्ये अंबर (लाल, पिवळे) दिवे ठेवत असल्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून मोठय़ा प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्याने हे दिवे शोधण्यासाठी पोलिसांनी खास पथके तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय वाहन असल्याचे भासविण्यासाठी खासगी वाहनचालकांकडून असा प्रकार बिनधास्तपणे सुरू आहे. वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याचे वाहन असल्याचे भासविण्यात येत असल्यामुळे वाहतूक पोलीसही अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी फारसे उत्सुक नसतात.
विशेष म्हणजे, पोलीस तसेच रुग्णवाहिका या वाहनांव्यतिरिक्त सायरन लावण्याचे अधिकार नसतानाही काहीजण दुचाकी तसेच चारचाकी वाहनांमध्ये सायरन लावून ‘शायनिंग’ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, या सर्व प्रकारांकडे शासकीय यंत्रणा आणि पोलिसांचे सपशेल दुर्लक्ष होत आहे. राज्यातील टोल नाक्यांवर शासकीय अधिकारी, पोलीस तसेच मंत्री, आदींच्या वाहनांना विशेष सूट देण्यात आली असल्याने त्यांना टोल भरावा लागत नाही. याच पाश्र्वभूमीवर खासगी वाहन चालकांनी शासकीय वाहन असल्याचे भासविण्यासाठी वाहनांमध्ये अंबर (लाल, पिवळे) दिवे ठेवण्याचे प्रकार सूरू केले आहेत. या वाहनांच्या डेस्क बोर्डवर अशा प्रकारचे दिवे ठेवण्यात येतात. त्यामुळे वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याचे वाहन असावे, असा समज नागरिक तसेच पोलिसांचा होतो. या प्रकारांमुळे टोल नाक्यावरील कर्मचारी तसेच वाहतूक पोलीस यंत्रणाही चक्रावल्या आहेत. अशा वाहनांविरोधात कारवाईचा बडगा उगारलाच तर वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याचे वाहन असल्याची बतावणी करून वाहन चालकांकडून दमबाजी करण्यात येते, असा वाहतूक पोलिसांचा आजवरचा अनुभव आहे. तसेच अशा वाहनांवर कारवाई करताना खऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे वाहन अडविल्यास त्याच्या भावना दुखावतात आणि मग चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लागतो, असाही वाहतूक पोलिसांचा अनुभव आहे. त्यामुळेच वाहतूक पोलीस अशा वाहनांविरोधात कारवाई करण्याच्या फारशा भानगडीत पडत नाहीत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
दिव्यांवर र्निबध नाहीत..
शासकीय अधिकारी, पोलीस तसेच मंत्री आदींच्या वाहनांना अंबर दिवे लावण्याची मुभा असते. मात्र, या दिव्यांच्या विक्रीवर कोणत्याही प्रकारचे र्निबध नाहीत. त्यामुळे बाजारात अशा प्रकारचे दिवे अवघ्या पाचशे ते सहाशे रुपयांत मिळतात. त्यामुळेच त्याचा फायदा शायनिंग मारण्यासाठी तसेच टोल वाचविण्यासाठी होऊ लागला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. अंबर दिव्यांचे वाढते प्रकार रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक नियमावली तयार करायला हवी. तसेच राज्य शासनाच्या परिपत्रकाशिवाय कोणालाही अंबर दिवे बसवून देऊ नये, अशा सूचना जारी केल्या पाहिजेत, असे मत आता पोलीस दलातच व्यक्त होत आहे.
वाहनांना बेकायदा सायरन..
पोलीस तसेच रुग्णवाहिका या वाहनांव्यतिरिक्त कोणत्याही वाहनांना सायरन लावण्याचे अधिकार शासनाने देऊ केले नाहीत. मात्र, सध्या गल्लीबोळात फिरणाऱ्या दुचाकींना अशा प्रकारचे सायरन लावण्यात येत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, काही चारचाकी वाहनांमध्ये अशा प्रकारचे सायरन बसविण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी हॉर्न वाजविण्याऐवजी या चालकांकडून सायरन वाजविण्यात येतो. तसेच काही ठिकाणी पोलीस असल्याची भीती दाखविण्यासाठीही सायरन वाजविण्याचे प्रकार सुरू आहेत. असे असतानाही अशा वाहनांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे अशी वाहने खुलेआमपणे शहरात फिरत असल्याचे चित्र आहे.

Story img Loader