नोकरीनिमित्त किंवा अन्य कारणास्तव घराबाहेर पडणाऱ्या महिलांना मुंबईत तुम्हाला नेमके कुठे असुरक्षित वाटते, असे विचारले तर बहुतांश महिला ‘रेल्वे प्रवास’ असेच उत्तर देतील. दुर्दैवाने या महिलांना दिलासा देणारे उत्तर सध्यातरी रेल्वे पोलीस आयुक्तांकडे नाही. कारण, गरजेच्या तुलनेत अपुऱ्या असलेल्या पोलिसांच्या संख्येमुळे तेही हतबल झाले आहेत.
महिलांच्या प्रत्येक डब्यात रात्रीच्या वेळेस पोलीस असणे आवश्यक आहे. तशी मागणी महिला प्रवाशांनी वेळोवेळी केली आहे. रेल्वेत किंवा स्थानकात कुठेच सीसीटीव्ही कॅमेरे वा आधुनिक गॅझेट्ची सोय नसल्याने रात्री प्लॅटफॉर्मवरील पोलिसांची संख्या वाढविण्याचीही मागणी आहे. परंतु, अपुऱ्या मनुष्यबळामुळे आता एकाच पोलिसाकडे संपूर्ण गाडीची जबाबदारी असते. या एका पोलिसाने महिलांच्या तीन डब्यांवर लक्ष कसे ठेवायचे असा प्रश्न आहे.
रात्री-अपरात्री लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांच्या प्रत्येक डब्यात एक पोलीस द्यायचा म्हटला तर दररोज रात्री तब्बल २,६०० पोलीस आवश्यक आहेत. पण, रेल्वे पोलिसांकडे शिपाई आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी मिळून एकूण मनुष्यबळ आहे ३,५०० पोलीस. या सर्वाना रात्रपाळी लावणे शक्य नाही. शिवाय प्रत्येक रेल्वे स्थानकावर एक अधिकारी तैनात ठेवावा लागतो. त्यातून जे उरतात ते उशीरा प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षा पुरविण्यास अपुरे ठरतात.
पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या महिलांच्या प्रत्येक डब्यात एक पोलीस ठेवायचा तर आणखी ८८२ पोलिसांची गरज रेल्वे पोलीस प्रशासनाला आहे. या अपुऱ्या मनुष्यबळामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांची स्थिती फारच वाईट बनली आहे, अशी कबुली खुद्द मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त प्रभात कुमार यांनी दिली. आजच्या घडीला महिला प्रवाशांवर हल्ले किंवा त्यांची लुबाडणूक होण्याचे गुन्हे सर्वाधिक आहेत. पण, अपुऱ्या मनुष्यबळामुळे महिला प्रवाशांना सध्या पुरविल्या जाणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेपेक्षा अधिक काही करणे आपल्या हातात नाही, अशी हतबलताच त्यांनी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा