बदली होऊ नये यासाठी अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र सादर करण्याच्या प्रकाराच्या मुळापर्यंत पोलीस पोहचले असून आता आरोपींना तसेच दलालांना काही राजकीय पाठबळ होते का याचा तपास सुरू आहे. ही प्रमाणपत्रे मिळवून देणारा दलाल महेश बारगजे याची कसून चौकशी सुरू असून त्यातून काही हाती लागेल असा पोलिसांचा अंदाज आहे.
प्रकरण उघडकीस आल्यापासून बारगजे फरारच होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अनिल भारती यांनी त्याला कर्जत तालुक्यात जाऊन अटक केली. सुरूवातीला मला काही माहिती नाही असे सांगणाऱ्या बारगजे याने पोलीस कोठडीत तोंड उघडले असून काही महत्वाची माहिती पोलिसांना दिली असल्याचे समजते. गणपत शंकर लगड या घारगाव (ता. श्रीगोंदे) या आणखी एका एजंटाला भारती यांनी अटक केली असून त्याचे वय ८० आहे. त्याला न्यायालयाने आज २ दिवसांची पोलीस कोठडी दिली. त्याच्याकडेही पोलीस चौकशी करत आहेत.
संतोष लष्करे या एंजट कम शिक्षकाला आज या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले. राजेंद्र पोकळे (श्रीगोंदे), कांबळे (श्रीरामपूर) या आणखी दोन एजंटांच्या शोधात पोलीस आहे. प्रमाणपत्र घेणाऱ्या ७६ शिक्षकांपैकी बहुतेक जण आता पोलिसांकडे हजर झाले असून फक्त ३ शिक्षक बाकी आहेत. तेही लवकरच हातात येतील असा विश्वास पोलिसांना आहे. एजंट सापडल्यामुळे आता या प्रकरणात नक्की काय घडले, कोणाच्या बळावर हे एजंट काम करत होते, त्यांना जिल्हा रुग्णालयातून कोणाची मदत होत होती याकडे आता पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे.
पोलिसांनी सांगितले की एका शिक्षकाला प्रमाणपत्रासाठी किमान १० हजार रूपये व जास्तीत जास्त २५ हजार रूपये खर्च येत होता. शिक्षकाची आर्थिक स्थिती पाहून एजंट त्यांना पैसे मागायचे. काहींनी हप्त्याने पैसे दिले तर काहींनी रोखीने व्यवहार करून प्रमाणपत्र लगेचच ताब्यात घेतले. सुरूवातीला एकदोन जणच हे काम करत होते. नंतर मात्र काहींना त्यांचा मार्ग सापडून त्यांनीही काम सुरू केले. शिक्षक हेरायचा, त्याला पटवायचे, नंतर पैसे ताब्यात घ्यायचे व काही दिवसांनी बोगस प्रमाणपत्र आणून द्यायचे या पद्धतीने हा प्रकार सुरू होता. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की मोठा राजकीय वरदहस्त असल्याशिवाय इतके सर्रासपणे गैरकाम होणार नाही. बरेचसे एजंट हातात आल्याने आता या सर्व प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहचले आहेत ते लक्षात येईल.

Story img Loader