भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कवायतीची पूर्वतयारी पोलीस यंत्रणेने सुरू केली असली तरी ज्या ठिकाणी संचलनाचा सराव केला जातो, त्या पोलीस कवायत मैदानावर दोन हेलिकॉप्टरचा ठिय्या असल्याने कवायतीत काहिसा अडसर निर्माण झाला आहे. त्यातील एक हेलिकॉप्टर दस्तुरखुद्द पालकमंत्र्यांशी संबंधित तर दुसरे गृहमंत्र्यांच्या पाहुण्यांचे असल्याने कवायत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची स्थिती ‘तोंड दाबून गुद्दय़ांचा मार’ अशी झाली आहे.
प्रजासत्ताक दिनाची तयारी शासकीय पातळीवर सुरू झाली आहे. या दिवशी पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण सोहळा झाल्यानंतर पोलीस, नागरी संरक्षण दल, गृहरक्षक व शालेय विद्यार्थी यांच्या पथकांमार्फत शानदार संचलन केले जाते. यंदाच्या संचलनाच्या तयारीला सोमवारपासून पोलीस कवायत मैदानावर सुरूवात झाली.
पोलीस दलाच्या काही तुकडय़ा सकाळी कवायत मैदानावर दाखल झाल्या. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली त्यांचा सराव सुरू झाला. परंतु, त्यात काहिसा अवरोध ठरली ती या मैदानावर असलेली दोन हेलिकॉप्टर. मैदानाच्या मध्यभागावरील हेलीपॅडवर दोन्ही हेलिकॉप्टर होती. त्यामुळे सराव करणाऱ्या जवानांना फेरफटका मारुन कवायतीचे नियोजन करणे भाग पडले. ही दोन्ही हेलिकॉप्टर मान्यवर नेत्यांची असल्याने त्याविषयी काय बोलणार, अशी सर्वाची अवस्था होती.
पोलीस कवायत मैदानावर ठिय्या मारणाऱ्या हेलिकॉप्टरची माहिती घेतली असता त्यातील एक नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित तर दुसरे हेलिकॉप्टर आर. आर. पाटील यांच्या पाहुण्यांचे असल्याचे सांगण्यात आले. हेलिकॉप्टरसाठी पोलिसांच्या विशेष शाखेकडून परवानगी दिली जाते. या दोन्ही हेलिकॉप्टरसाठी तशी रितसर परवानगी घेण्यात आल्याचे या शाखेकडून सांगण्यात आले. त्यातील भुजबळ यांचे हेलिकॉप्टर हवामानातील बदलामुळे परत आल्याचे या शाखेकडून सांगण्यात आले.
गृहमंत्र्यांच्या पाहुण्यांचे हेलिकॉप्टर दुपारनंतर रवाना झाल्याचे पोलीस मुख्यालयातील कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Story img Loader