नववर्षांच्या स्वागताच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांविरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेंर्तगत ४४१ वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये ३१ डिसेंबर ते १ जानेवारीच्या पहाटे पाच वाजेपर्यंत तब्बल ३२७ मद्यपी वाहनचालकांचा समावेश आहे. नवीन पनवेलमध्ये सर्वाधिक मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. कारवाई करण्यात आलेल्या वाहनचालकांना गुरुवारी वाशी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या ठिकाणी न्यायालयाने ठोठावलेल्या दंडाची आकारणी संबंधितांकडून करण्यात आली.
नववर्षांचा जल्लोष आणि मद्यपान हे तरुणांचे सूत्र त्यांच्यासह अनेकांच्या जिवावर बेतणारे आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणे हे कायद्यानुसार गुन्हा असून चालकासह इतरांचे प्राणदेखील संकटात सापडतात. या विरोधात वाहतूक पोलिसांकडून जनजागृती करण्यासाठी सातत्याने सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र जल्लोषाच्या नावाखाली झिंगणाऱ्या nmv05तरुणाईकडून या नियमांचे उल्लंघन करण्यात येते. नववर्षांच्या पाश्र्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम आयोजित केली होती. या आठ दिवसांच्या विशेष मोहिमेत ४४१ मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात ३१ डिसेंबरला मध्यरात्री १७७, तर मध्यरात्र ते १ जानेवारी पहाटे ५ वाजेपर्यंत केलेल्या कारवाईत १५० अशा एकूण ३२७ वाहनचालकांचा यात समावेश आहे. आठवडाभरातील कारवाईत नवीन पनवेलमध्ये सर्वाधिक ७६ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
यापाठोपाठ कळंबोली ४६, पनवेल- ३७ , तळोजा- ३६, सीवूड- ३२, वाशी- ३०, एपीएमसी- २९, उरण आणि सीबीडी बेलापूर- २८, तुर्भे आणि खारघर- २१, महापे- १८ , रबाले- १७, कोपरखैरणे- १३, न्हावा-शेवा- ९ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
नववर्षांच्या जल्लोषात तरुणाई सामाजिक भान आणि व्यक्तिगत जबाबदारीचे भान विसरू नये. घरी आपली कोणीतरी वाट पाहत असते याची जाणीव प्रत्येकाने ठेवली तर या कारवाईची वेळ येणार नाही, अशी आशा वाहतूक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.  

३१ डिसेंबरच्या पाश्र्वभूमीवर मुख्य रस्ते, चौक या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यात वाहतूक पोलीस विभागातील १५, वाहतूक चौकीतील २६ पोलीस अधिकारी आणि ३०६ पोलीस कर्मचारी तैनात होते.

Story img Loader