जिल्हाधिकाऱ्यांच्या स्मरणपत्रांना केराची टोपली
 जिल्हा बीअर बार असो.तील अंतर्गत वाद
उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाने शहरातील ३३ बीअर बारच्या वाहनतळाचा अहवाल दडवून ठेवला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळा स्मरणपत्र दिल्यानंतरही केवळ बीअर बार असोसिएशनच्या आपसी भांडणात केवळ ७ बारला पार्किंग नसल्याचा अहवाल दिला आहे. दरम्यान, जिल्हा बीअर बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला हाताशी पकडून ही करामत केल्याची चर्चा हॉटेल वर्तुळात आहे.
या शहरात एकूण ५६ बीअर बार आहेत. जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी वाहनतळाचा मुद्दा समोर करून शहरातील बीअर बार व हॉटेल व्यावसायिकांना कचाटय़ात पकडले आहे. वाहनतळ असल्याचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणार नाही तोवर फुड लायसन्स देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. याच भूमिकेतून त्यांनी आतापर्यंत शहरातील आठ बीअर बार व हॉटेलला सील ठोकले आहे. यात एन्जॉय, माऊंट, परेराज व सुपरस्टार या चार बीअर बारसोबतच रसराज, लि शेफ, व्हेज जंक्शन, सूजी फुड व बंगाली कॅम्पमधील संस्कृती या हॉटेलचे फुड परवाने अडवून धरले आहे. परिणामी, या परवान्याअभावी आठही हॉटेल सध्या बंद आहेत. मात्र, उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी ३३ बीअर बारच्या वाहनतळाचा अहवाल दडवून ठेवल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व बीअर बारला फुड परवाना दिलेला आहे. त्यामुळे ज्या आठ बीअर बार व हॉटेलवर कारवाई केली त्यांच्यात तीव्र नाराजी आहे.
प्रत्यक्षात जिल्हा बीअर बार असोसिएशनमधील अंतर्गत भांडणातून ही कारवाई झाल्याचेही समोर आले आहे. बीअर बार असोसिएशनमध्ये दोन गट आहेत. यातील एक गट असोसिएशनमधून बाहेर पडला आहे. त्याला कारण जिल्हाधिकारी कार्यालयाने शहरातील ५६ बीअर बारच्या पार्किंगचा अहवाल महानगरपालिका व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. राजू भुजबळ यांच्याकडे मागितला होता. ही बाब जिल्हा बीअर बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना कळताच आता सर्व बीअर बारवर कारवाई होणार, हे त्यांच्या लक्षात आले आणि बार असोसिएशनच्या काही पदाधिकाऱ्यांनी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला हाताशी धरून केवळ सात बीअर बारच्या वाहनतळाचा अहवाल सादर करण्यास सांगितले. त्यामुळे पोलिस दलाने जिल्हाधिकारी कार्यालयात १४ बारला पार्किंग असल्याचा व ७ बारला ते नसल्याचा अहवाल सादर केला. उर्वरीत ३३ बीअर बारचा पार्किंगचा अहवाल अजूनही सादर केलेला नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयाने यासंदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. राजू भुजबळ यांना आतापर्यंत दोन स्मरणपत्रे दिल्यानंतरही त्यांनी ३३ बीअर बारच्या पार्किंगचा अहवाल दिलेला नाही. दुसरीकडे, अहवाल मिळण्यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व बीअर बारला फूड लायसन्स देऊन टाकले आहेत. त्यामुळे एका हॉटेल व्यावसायिकाला एक कायदा आणि दुसऱ्याला दुसरा कायदा, अशी ओरड आता असोसिएशनबाहेर पडलेल्या हॉटेल व बार मालकांनी सुरू केली आहे. शहरातील करण, प्रिन्स, अश्विनी, डी.के. वाईन, अनूजा, पॅलेस, गोल्डन वाईन, सरोवर, सांस्कृतिक वाईन, कस्तुभ बार, डेलीकसी, ब्लू पॅराडाईज, पिकॉक, हर्षल वाईन, दीपक, मनोरंजन, रसोई, डायमंड यासह ३३ बीअर बारला खरोखर वाहनतळ नाही. विशेष म्हणजे, जिल्हा बीअर बार असोसिएशनचे अध्यक्ष निटू भाटीया यांच्या दीपक, तसेच सचिव संदीप चवरे यांच्या मनोरंजन बीयर बारला वाहनतळ नाही.
असे असूनही केवळ जिल्हा बीअर बार असोसिएशनचे पदाधिकारी असल्याच्या कारणाने त्यांना वाहनतळ नसतांना सुध्दा फूड लायसन्स देण्यात आले आहे. या कारवाईने जिल्हा बीअर बार असोसिएशनमध्ये अंतर्गत भांडणाला सुरुवात झालेली आहे. या सर्व बीअर बारला पार्किंग नसतांना २९ मार्च २०१२ मध्ये तेव्हाचे जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी ४१ बारमध्ये पार्किंग असल्याचे ना हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे. यावरूनच जिल्हा प्रशासन व पोलिस दलात किती भोंगळ कारभार सुरू आहे, हे लक्षात येते. बीअर बारच्या भांडणात शहरातील साधे हॉटेल व्यावसायिक पिळले जात असून आता तर जिल्हाधिकाऱ्यांनी छोटय़ा मोठय़ा रेस्टॉरंट व हॉटेलला सुध्दा वाहनतळाची नोटीस बजावल्याने हा वाद चांगलाच रंगलेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा