गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी ३० हजाराची लाच मागणाऱ्या सांगली जिल्ह्यातील उमदी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षकाला गुरुवारी मध्यरात्री अटक करण्यात आली असून त्याला मदत करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांलाही अटक केली आहे. न्यायालयाने शुक्रवारी या दोघांची रवानगी पोलीस कोठडीत केली. लाचलुचपत विभागाने लावलेल्या सापळ्याची कुणकुण लागताच या सहायक पोलीस निरीक्षकाने लाचेची रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळही केली.
दामाजी तानाजी पवार (रा. सनमडी, ता. जत) याचा पुतण्या सुनील पवार याच्या विरुद्ध उमदी पोलीस ठाण्यात जमीन वादातून गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ लक्ष्मण राठोड यांनी बादशहा अब्दुल मणेर (रा. सनमडी) याच्यामार्फत ३० हजार रुपये लाच मागितली होती. पवार यांनी याबाबत सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला होता. दि. ४ ऑक्टोबर २०१३ रोजी पवार यांना स.पो.नि. श्री. राठोड यांनी भेटण्यास बोलाविले होते. दि.७ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत विभागाने पुन्हा सापळा लावला. या सापळ्याची कुणकुण लागताच राठोड यांनी लाच स्वीकारण्यास नकार दिला. प्रथम लाच घेण्यास अनुकूलता दर्शवून पुन्हा ती स्वीकारण्यास टाळाटाळ केली. संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता भ्रमणध्वनीही बंद केल्याचे निष्पन्न झाले.
राठोड यांना लाच देण्यासाठी बादशहा ऊर्फ बासू मणेर याने प्रोत्साहित केले होते. सापळ्यात हे दोघेही सापडले नाहीत म्हणून तसा अहवाल लाचलुचपत विभागाने वरिष्ठांना पाठविला होता. वरिष्ठांच्या आदेशानुसार या दोघांविरुद्ध उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन गुरुवारी रात्री उशिरा दोघांनाही अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली असून दोघा आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलीस कस्टडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर हे करीत आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी शासकीय कामाकरिता शासकीय कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यास लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन बाबर यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा