बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक महिबूब मुजावर व त्यांच्या पत्नी नीलोफर मुजावर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांना विशेष न्यायालयासमोर हजर केले असता दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
काही महिन्यांपूर्वी पोलीस निरीक्षक मुजावर व त्यांच्या पत्नीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ लाख ५४ हजारांची अवैध मालमत्ता बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्हय़ात अटक टाळण्यासाठी मुजावर दाम्पत्याने विशेष न्यायालयात अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर अखेर अटक करण्यात आली. सध्या मुंबईत मानवी हक्क संरक्षण विभागात नेमणुकीस असलेले पोलीस निरीक्षक मुजावर यांचा बराच सेवा काळ सोलापूर शहर व जिल्हय़ात गेला आहे. दक्षिण सदर बझार भागातील राहत्या निवासस्थानी त्यांना अटक करण्यात आली.
यापूर्वीही एकदा पोलीस निरीक्षक मुजावर यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी कारवाई केली होती. त्या वेळी अटक करताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयातील तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त हिंदुराव चव्हाण यांनी आपणास मारहाण केल्याचा आरोप मुजावर यांनी केला होता. त्या वेळी ते बरेच दिवस शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते. त्यामुळे हे प्रकरण त्या वेळी बरेच गाजले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा