पुरातन काळापासून बहिणीच्या रक्षणासाठी भाऊ धावून आल्याच्या घटना, कथा सर्वज्ञात आहेत. आजच्या असंवेदनशील काळातही शासकीय कक्षेच्या पलीकडे जाऊन भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांनी अशाच बहिणीच्या हाकेला प्रतिसाद देताना वर्षभरापासून पोलीस जमादारकडून सुरू असलेल्या मानसिक छळातून तिची सुटका करीत रक्षाबंधनाची आगळी भेट दिली.
सरकारी विशेषत: पोलीस विभागातील अधिकाऱ्यांच्या कोडगेपणाचे अनुभव अनेकांना असले, तरी गेल्या वर्षांपासून पोलीस जमादाराच्या मानसिक छळवादाला बळी पडलेल्या शिक्षक दाम्पत्याची सुटका करण्याचे सत्कार्य एका पोलीस निरीक्षकाने पार पाडले. पोलीसमित्र योजनेचा गवगवा करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने सामान्याला न्यायाच्या भूमिकेतून कर्तव्य बजावणाऱ्या गौतम यांच्या या सत्कार्याने अनेकांना भुरळ घातली.
शहरातल्या अयोध्यानगर परिसरात शिक्षक दाम्पत्य वास्तव्यास आहे. रमेश जिवबाचे जिल्हा परिषद शाळेत, तर त्यांची पत्नी रंजना खासगी शाळेत विद्यादानाचे कार्य करते. आपण भले आपले काम भले या भूमिकेतून वावरणारे हे दाम्पत्य गेल्या वर्षभरापासून मानसिक त्रासाला वैतागले होते. स्वकष्टाने उभारलेल्या इमारतीत या दाम्पत्याने तीन खोल्या नांदेड पोलीस दलात कार्यरत जमादाराला भाडय़ाने दिल्या. सुरुवातीचे काही महिने जमादाराने नियमित भाडे दिले. पण गेल्या वर्षभरापासून जमादाराने भाडे तर दिलेच नाही. शिवाय खोल्याही रिकाम्या करण्यास टाळाटाळ चालवली. शिक्षक दाम्पत्याने विनवण्या केल्या, अनेक वेळा घराचे उंबरठे झिजवले. पण जमादाराने दाद दिली नाही.
सुमारे दीड-दोन महिन्यांपूर्वी भाग्यनगर पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारणाऱ्या निरीक्षक गौतम यांनी आपल्या कार्यपद्धतीची वेगळीच छाप पाडली. ”सद्रक्षणाय खलनिग्रहनाय”ला खऱ्या अर्थाने न्याय देत कार्य करणाऱ्या गौतम यांना सामान्यांनी डोक्यावर घेतले. पोलीस दलातल्या कामचुकार, निष्क्रिय अधिकाऱ्यांना ‘सरळ’ करून सामान्यांना कायद्याचे ज्ञान देणाऱ्या गौतम यांची या शिक्षक दाम्पत्याने भेट घेतली. वर्षभरापासून सुरू असलेली कोंडी, कैफियत समोर मांडल्यानंतर गौतम यांनी तत्काळ संबंधित जमादाराला सज्जड दम दिला.  शासकीय कक्षेच्या पलीकडे जात कठोर भूमिका घेतली व रक्षाबंधनाच्या दिवशीच जमादाराकडून घर रिकामे करून घेतले. शिवाय वर्षभराचे भाडेही या दाम्पत्याला धनादेशाद्वारे सुपूर्द केले.