शहरात गुन्हेगारांवर विशेषत: सोनसाखळी चोरी करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या वतीने शहराच्या प्रवेशद्वारावर ११ नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी घेतला आहे. कॅमेऱ्यांचे विद्युत आणि इंटरनेट जोडणी बिलावरून मध्यंतरी वाद झाल्याने या कॅमेऱ्यांसाठी आयुक्तालयाला प्रायोजक शोधावे लागणार आहेत असे दिसून येते. नवी मुंबईत सोनसाखळी चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. एकाच दिवशी सहा चोऱ्यांचा विक्रमही झाला आहे. त्यामुळे इतर गुन्ह्य़ांपेक्षा सोनसाखळी चोरीच्या घटना शहरात वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या तो चिंतेचा विषय ठरला आहे. सुनियोजित शहरात रस्ते चकाचक असल्याने सोनसाखळ्यांवर हात साफ केल्यानंतर या चोरटय़ांना पळण्यास हे रस्ते सोयीचे पडत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या गुन्ह्य़ावर कडक उपाययोजना करण्याचे पोलीस आयुक्त प्रसाद यांनी ठरविले असून चोऱ्या करून चेंबूर व मुंब्रा येथे पळून जाणाऱ्या चोरटय़ांवर लक्ष ठेवण्यासाठी ११ जादा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तरतूद करण्यात येणार आहे. मुंबईहून नवी मुंबईत प्रवेश करण्यासाठी वाशी व ऐरोली टोल नाक्यांचे दोन प्रमुख मार्ग असून याशिवाय ठाण्याहून ये-जा करताना मुकुंद कंपनीजवळ, कल्याण डोंबिवलीकरांना शिळफाटा मार्ग, सायन-पनवेल हा महामार्ग आणि उरणसाठी आम्रपाली मार्ग असे एकूण सहा मार्ग आहेत. गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर या पाच मार्गापैकी एकाचा वापर पळून जाण्यासाठी करीत असल्याचे दिसून येते. नवी मुंबई पालिकेच्या वतीने यापूर्वी शहरात मोक्याच्या ठिकाणी २६२ सीसी कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र ठाणे व मुंब््रयाकडील मार्गावर कॅमेरे लावण्यात आलेले नाहीत. त्या ठिकाणी आता पोलिसांच्या वतीने नव्याने कॅमेरे लावण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे पोलिसांना अनेक गुन्ह्य़ांची उकल होण्यास मदत झालेली आहे. मध्यंतरी शहरात लावण्यात येणाऱ्या कॅमेऱ्यांचे वीजबिल व इंटरनेट बिल यावरून वाद झाला होता. पालकमंत्री गणेश नाईक यांनी यात मध्यस्थी करून दोन्ही बिले पालिकेला भरण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे कॅमेरे पुन्हा सुरू झाले. सोनसाखळी चोरटे वापरत असलेल्या मोटारसायकलींचा क्रमांक टिपणे या कॅमेऱ्यांमुळे शक्य होणार आहेत. याशिवाय टोल किंवा तपासणी नाक्यांवर हेल्मेट काढणे बंधनकारक केले जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांचा चेहरा तपासणी नाक्यांवर लावण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपता येणार आहे. नवी मुंबई एक नियोजनबद्ध शहर असल्याने या शहरात प्रवेश करण्यासाठी फारशी प्रवेशद्वारे नसून लोकसंख्या इतर शहरांच्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे येथील सोनसाखळी चोरटय़ांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे आळा घालता येण्यासारखा असल्याचे आयुक्त प्रसाद यांचे मत आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर लवकरात लवकर कॅमेरे लावण्याच्या सूचना प्रसाद यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा