सिंहस्थ कुंभमेळ्याची घटिका समीप येऊ लागल्याच्या पाश्र्वभूमीवर, शहर पोलीस आयुक्तालयाने मध्यवस्तीतील ज्या गोदातीरी हा कुंभमेळा भरतो, तो संपूर्ण परिसर आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अवगत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. रामकुंड, तपोवन, साधुग्राम, शाहीमार्ग या भागांत दररोज साधारणत: १०० पोलीस कर्मचाऱ्यांना नेऊन परिसरातील सिंहस्थात बाहेर येणारे व जाणारे मार्ग, विशेष व्यक्तींसाठी असणारे मार्ग, आपत्कालीन मार्ग, वाहनतळ आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. शहर पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी या संपूर्ण परिसराशी सखोलपणे परिचित असावा, या दृष्टिकोनातून हाती घेतलेली मोहीम पुढील दोन महिने चालणार आहे.
शासकीय पातळीवरून सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू झाली असून त्यातील संभाव्य अडचणींवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मागील सिंहस्थात शाही मिरवणुकीवेळी चेंगराचेंगरी होऊन ३४ भाविकांना प्राण गमवावे लागले होते. शहराच्या मध्यवस्तीत भरणाऱ्या कुंभमेळ्यासमोर अतिशय कमी उपलब्ध असलेली जागा ही न सोडविता येणारी समस्या आहे. पर्वणीच्या दिवशी गोदावरी पात्रात रामकुंड या एकाच परिसरात स्नानासाठी भाविकांची गर्दी उसळते. आगामी कुंभमेळ्यात गर्दीचे व्यवस्थापन हे सर्वात मोठे आव्हान आहे. जनसागराच्या व्यवस्थापनाचे आव्हान लक्षात घेत पोलीस आयुक्तालयाने हाज यात्रेत गर्दीचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘ब्युरो हॅपोल्ड’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित संस्थेची मदत घेण्याचे निश्चित केले आहे. दुसरीकडे आपले सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कुंभमेळा व आसपासच्या परिसराविषयी अवगत करण्याचे काम हाती घेतले आहे.
या मोहिमेला पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपायुक्त पंकज डहाणे व इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. पहिल्या दिवशी साधारणत: १०० अधिकारी व कर्मचाऱ्यांना रामकुंड, तपोवन, शाही मार्ग या ठिकाणी नेण्यात आले. पोलीस आयुक्तालयांतर्गत एकूण २३०० अधिकारी व कर्मचारी आहेत. दररोज ८० ते १०० जणांना उपरोक्त परिसरात प्रत्यक्ष अभ्यास व अवलोकनार्थ नेले जाणार आहे. सिंहस्थ काळात बंदोबस्ताची मुख्य भिस्त शहर पोलिसांवर आहे. त्यामुळे या परिसराविषयी अधिकारी व कर्मचाऱ्यांना अवगत केले जात असल्याचे डहाणे यांनी सांगितले. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलीस यंत्रणेने रामकुंड, शाही मार्ग, तपोवनातील साधुग्राम या भागाचे नकाशे तयार केले आहेत. परिसरातील संपूर्ण रस्ते, वाहनतळासाठी निश्चित केलेली ठिकाणे, कोणत्या भागात अधिक गर्दी होऊ शकते, लोखंडी जाळ्या कुठे व कशा असतील, आपत्कालीन मार्ग कोणते, विशेष व्यक्तींसाठी असणारे मार्ग कोणते, साधू-महंत व भाविक कोणकोणत्या बाजूने रामकुंड आणि गोदावरीच्या काठावर पोहोचतील या मुद्दय़ांवर प्रत्यक्ष अवलोकन केले जात आहे.
आगामी कुंभमेळ्यात नाशिक व त्र्यंबकेश्वर या ठिकाणी २९ ऑगस्ट २०१५ आणि १३ सप्टेंबर २०१५ या शाही स्नानाच्या दोन्ही तिथी एकाच दिवशी येत आहेत. त्या दिवशी लाखो भाविक दोन्ही ठिकाणी स्नानासाठी जाण्याची शक्यता आहे. ३० किलोमीटर अंतरावरील दोन्ही बाजूकडील भाविकांच्या प्रवासाचा प्रचंड ताण पडणार आहे. या दोन्ही दिवसांबरोबरच घाटाकडे येणारे मार्ग, शाही मिरवणूक यात गर्दीचे व्यवस्थापन करणे हे पोलीस यंत्रणेसमोरील प्रमुख आव्हान आहे. या पाश्र्वभूमीवर पोलिसांना उपरोक्त परिसराविषयी वेगवेगळ्या बाबींबद्दल मार्गदर्शन केले जात आहे. मागील सिंहस्थात या ठिकाणी बंदोबस्तावर असणाऱ्या अधिकाऱ्यांची मदत यंत्रणा घेणार आहे.

Story img Loader