गोवंश रक्षणाचा कायदा खुलेआम पायदळी तुडविला जात असल्याचे अनेक घटनांमधून दिसते. ज्या खात्यावर या कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी असते त्या पोलीस दलाची भूमिका तर यासंबंधी अनेकदा संशयास्पद असल्याचे आढळून येत असते. एकीकडे या कायद्याचे उल्लंघन होत असताना दुसरीकडे कायद्याच्या चौकटीत गोरक्षणाचे काम करणाऱ्या गोरक्षकांविरुद्ध मात्र पोलिसांत खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा छळ केला जात असल्याची तक्रार आहे. त्यामुळेच पोलीस आणि कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करणाऱ्यांमध्ये काही साटेलोटे तर नसावे ना, अशी शंका घेण्यास वाव मिळतो. मालेगाव येथील सुभाष मालू या गोरक्षकाला अलीकडेच थेट दरोडय़ाच्या गुन्ह्य़ात अटक करण्याचा विषय सध्या गाजत असून मालूंचा गुन्हा काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
धष्टपुष्ट जनावरांची कत्तल होऊ नये म्हणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकरवी प्रत्येक जनावराची तपासणी कायद्याने अनिवार्य आहे. तसेच जनावरांची निर्दयपणे वाहतूक करू नये, असा नियम आहे. परंतु बऱ्याचदा या नियमांचे पालन होताना दिसत नाही. सर्वसाधारणपणे नामपूर, सटाणा, धुळे, साक्री, चाळीसगाव, मनमाड, चांदवड आदी भागांतून सुस्थितीतील जनावरे मोठय़ा प्रमाणावर मालेगाव येथे कत्तलीसाठी आणली जातात. वाहनांमध्ये जनावरे अक्षरश: कोंबली जातात. बऱ्याचदा अशा वाहनांना पकडून ते पोलिसांच्या हवाली करण्याचे काम गोरक्षक कायद्याच्या चौकटीत राहून करीत असतात. असे असल्याने बेकायदा वाहतूक करणारे संशयित गोरक्षकांविरुद्ध फिर्याद देतात आणि पोलीसही कोणतीही शहानिशा न करता गुन्हे दाखल करीत असतात, असा आक्षेप गोरक्षक मंडळींकडून घेण्यात येत आहे.
बारा वर्षांपासून गोरक्षणाचे काम करणारे सुभाष मालू यांच्याविरुद्ध आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यांमध्ये आठ-दहा गुन्हे दाखल आहेत. मालेगाव व परिसरातील तालुक्यांमध्ये मालू व त्यांच्या सहकाऱ्यांनी गोरक्षकांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनावरांची बेकायदा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित पोलीस ठाणे तसेच नियंत्रण कक्षाला प्रथम माहिती दिली जाणे व घटनास्थळी पोलीस आल्यावर वाहनांसह ही जनावरे पोलिसांच्या हवाली करणे, अशी सर्वसाधारणपणे गोरक्षकांची कार्यपद्धती असते. हे करीत असताना जनावरांची वाहतूक करणाऱ्यांच्या मुजोरीला त्यांना नेहमीच सामोरे जावे लागते. खुद्द मालू यांच्यावर यापूर्वी हल्ले झाले आहेत. गेल्या महिन्यात छावणी पोलिसांनी असेच एक वाहन पकडण्याचा प्रयत्न केल्यावर त्यातील चालकाने चक्क पोलिसांच्या वाहनाला ठोकर मारत पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. अलीकडे एका घटनेत कत्तलीसाठी शहराकडे जनावरे घेऊन येणारे वाहन काही गोरक्षकांनी चाळीसगाव फाटय़ाजवळ अडविले. कार्यकर्त्यांकरवी यासंबंधीची खबर मालू यांना मिळाल्यावर त्यांनी पोलिसांना भ्रमणध्वनीवरून माहिती देत हे वाहन व जनावरे ताब्यात घेण्याची विनंती केली. नंतर या वाहनातील लोकांना मारहाण करीत त्यांचे बैल तसेच बॅटरी चोरी केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्य़ात मालू यांना पोलिसांनी अटक केली. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणी मालू यांना अटक करण्यात पोलिसांनी दाखविलेली तत्परता हाच चर्चेचा व संशयाचा विषय आहे.
या घटनेतील संशयितांनी जनावरांची अवैध वाहतूक केली असल्याची फिर्याद खुद्द पोलिसांनी दाखल केली आहे. त्याच संशयितांपैकी एकाच्या फिर्यादीवरून सायने येथील नऊ तरुणांसह मालूंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे. या घटनेशी निव्वळ पोलिसांना माहिती देण्याइतपत आपला संबंध असल्याचे व ही माहिती आपण घरी असतानाच दिल्याचे पोलिसांना सांगितल्यावरही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मालूंना घरी येऊन अटक केली. जर त्यांना बैलांची चोरी करावयाची असती तर पोलिसांना आधी कल्पना तरी कशाला दिली असती, यासारखे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तीन वर्षांपूर्वी जनावरांच्या कत्तलीशी संबंधित एका व्यक्तीचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला होता. त्या वेळी त्याच्या नातेवाईकांनी मालू यांनी या व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप केला होता. मात्र पोलीस तपासात वस्तुस्थिती समोर आल्यावर त्यावर पडदा पडला होता. मालू यांच्यावर दहशत निर्माण करण्यासाठी अशा प्रकारे खोटे आरोप करण्यात येत असताना त्यांना अटक करण्याचा आततायीपणा पोलिसांनी केला असल्याची टीका करीत या अन्यायाविरुद्ध ‘मालेगाव बंद’सारखे आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय गोसेवा संघाचे अध्यक्ष केशरीचंद मेहता व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे.