गंभीर गुन्ह्यात अडकविण्याची भीती घालून २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ-या फौजदाराला लाच लुचपत विभागाने मंगळवारी दुपारी पोलीस ठाण्यातच अटक केली. हा फौजदार अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच प्रशिक्षणार्थी फौजदार म्हणून विश्रामबाग पोलीस ठाण्यात रुजू झाला होता.
याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सांगलीत राहणारी प्रेमी युगलाची जोडी १७ नोव्हेंबरपासून बेपत्ता होती. या संदर्भात संबंधित तरुणीच्या आईने विश्रामबाग पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दि. ११ डिसेंबर रोजी दाखल केली होती. याबाबत पोलीस ठाण्याकडील प्रशिक्षणार्थी फौजदार सतीश डौले हे या बेपत्ता मुलीचा तपास करीत होते.  
तपासामध्ये बेपत्ता तरुणी एका तरुणासोबत पुणे येथे असल्याचे निष्पन्न झाले. या बेपत्ता प्रकरणामध्ये मदत केली म्हणून संदीप बुद्धम सादरे (रा. वासूकाका जोशी हॉस्टेल, सदाशिव पेठ, पुणे)याच्यावर वहीम ठेऊन  डौले यांनी केसमधून सोडविण्यासाठी सादरे याच्याकडे २५ हजार रुपयांची मागणी केली होती. खोटय़ा केसमध्ये अटक करण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे चच्रेअंती २० हजार रुपये तक्रारदार सादरे यांनी देण्याची तयारी दर्शवली.
सादरे यांनी या प्रकाराबाबत पुणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. उपायुक्त सारंग आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद सातव, हवालदार मोहन जाधव, प्रसाद कुंभार, जगदीश कस्तुरे, विनोद झगडे, अविनाश इंगुळकर आदींच्या पथकाने मंगळवारी दुपारी पोलीस ठाण्यातच सादरे यांच्याकडून २० हजारांची लाच घेत असताना फौजदार सतीश डौले यांना रंगेहाथ पकडले.
डौले हे विश्रामबाग पोलीस ठाण्यात दि. ५ ऑक्टोबर २०१३ रोजी रुजू झाले असून, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. मूळचे अहमदनगर येथील असणारे डौले यांना प्रशिक्षणार्थी म्हणून काम करीत असताना एखाद्या गुन्ह्याचा तपास करता येतो का हाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.  पोलीस डायरीमध्ये युवती बेपत्ता झाल्याबाबत तक्रार स्वत: डौलै यांनी नोंदविली असून ठाणे अंमलदार यांना याबाबत कल्पना नसल्याचे चौकशी करता समजून आले. पोलीस डायरीमध्ये घटनेची नोंद करून तपासही डौले यांनी स्वत:कडे घेतला होता. त्यामुळे एकंदरीत या प्रकरणात संशयास्पद स्थिती निर्माण झाली आहे.

Story img Loader