शासकीय कर्तव्यावर रुजू असलेल्या निवासी डॉक्टरला पोलीस अधिकाऱ्यांनी कायदा हातात घेऊन बेदम मारहाण केल्याची घटना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयात सोमवारी पहाटे घडली. या घटनेचा निवासी डॉक्टर संघटनेने (मार्ड) तीव्र शब्दांत निषेध नोंदवत लगेचच सामूहिक रजा आंदोलन केले. रूग्णावर औषधोपचाराला विलंब होत असल्याच्या कारणावरून पोलीस अधिकाऱ्याने तेथील डॉक्टरला मारहाण केल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली असून, याप्रकरणी मार्डने आंदोलन हाती घेतल्यानंतर सायंकाळी संबंधित पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगण्यात आले.
यासंदर्भात मार्डच्या शिष्टमंडळाने डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे व पोलीस औयुक्त प्रदीप रासकर यांना भेटून निवेदन सादर केले. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर व अन्य दोन पोलिसांनी शासकीय रुग्णालयातील बी ब्लॉक इमारतीत शल्यचिकित्सा विभागात डॉ. प्रशांत लखीचंद पाटील या निवासी डॉक्टरला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली असून, या घटनेचे प्रत्यक्ष व्हिडिओ चित्रीकरणही झाले आहे. यात पोलीस निरीक्षक वायकर व त्यांचे दोन सहकारी डॉ. पाटील यांना बेदम मारहाण करताना स्पष्ट दिसतात. या घटनेमुळे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांमध्ये संताप व्यक्त होऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणून निवासी डॉक्टरला मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल मार्ड संघटनेचे सचिव डॉ. जितेंद्र रामटेके यांनी उपस्थित केला.
या घटनेच्या निषेधार्थ मार्डने सामूहिक रजा आंदोलन केले. या घटनेची व आंदोलनाची दखल वेळीच न घेतली गेल्यास मार्डला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यासंदर्भात प्राप्त झालेली माहिती अशी, की काल सोमवारी मध्यरात्री शहराजवळ बाळे येथे वाहन अपघात होऊन त्यात पाच जण जखमी झाले असता त्यांना उपचारासाठी पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यापैकी एका रुग्णावर शल्यचिकित्सा विभागात उपचार होण्यास विलंब होत असताना तेथे उपस्थित राहिलेले पोलीस निरीक्षक वायकर यांनी तेथील डॉ. प्रशांत पाटील यांना उपचाराला विलंब न करण्याची विनंती केली. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे चिडलेल्या वायकर यांच्यातील ‘माणूस’ जागा झाला व त्याने कायदा हातात घेऊन डॉ. पाटील यांच्यावर हात टाकला. मात्र मार्डने रुग्णावरील उपचाराकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप फेटाळला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा