रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणे प्रवासी भाडे आकारण्याबाबत मागील महिन्यात झालेल्या आंदोलनाची दखल घेत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी खारघर ते पनवेल रेल्वे स्थानकांवर वाहतूक कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या होत्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर सक्त कारवाईचे आदेश कर्मचाऱ्यांना उपायुक्तांनी दिले होते. मात्र नवलाईचे नऊ दिवस याप्रमाणे काही दिवस रेल्वे स्थानकाबाहेर दिसणारे हे कर्मचारी सध्या येथे पाहायला मिळत नाहीत. पोलीस उपायुक्तांच्या आदेशाला त्यांच्या कर्मचाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याने प्रवाशांना रिक्षाचालकांच्या मनमानीला पुन्हा सामोरे जावे लागत आहे.
पनवेलच्या जनजागृती ग्राहक मंचाने मीटरप्रमाणे रिक्षाभाडे आकारण्यासाठी पनवेल प्रादेशिक परिवहन विभागासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. या वेळी प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करू, असे आश्वासन दिले. त्याच वेळी वाहतूक विभागाचे उपायुक्त विजय पाटील यांनी पनवेलचा रिक्षा मीटरप्रमाणे चालण्यासाठी खारघर, मानसरोवर, खांदेश्वर आणि पनवेल रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूंना वाहतूक कर्मचारी तैनात करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले. सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री अकरा या वेळेत दोन पाळ्यांमध्ये १६ तासांसाठी दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या; परंतु वरिष्ठांनी दिलेले आदेश रस्त्यावर कायदा राबवणारे शिपाई पाळतातच असे नाही. उपायुक्त पाटील यांच्या आदेशाच्या प्रत्यक्षातील अंमलबजावणीसाठी जनजागृती ग्राहक मंचाचे पी. बी. सावंत आणि सहायक पोलीस आयुक्त दिलीप गोरे यांनी पाहणी केल्यानंतर पोलीस यंत्रणेचे कटुसत्य बाहेर आले. पनवेल रेल्वे स्थानकात ज्या कर्मचाऱ्याची नेमणूक केली होती, तो कर्मचारी जागेवर हजर नसल्याचे समोर आले. अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर गोरे यांना एका कर्मचाऱ्याने हजेरीची सलामी दिली. पोलीस अधिकारी गोरे यांनी कुठे होता आपण, आपल्याला कोणत्या कर्तव्यासाठी येथे तैनात केले, अशी प्रश्नावली झाडल्यानंतर कर्मचारी निरुत्तर झाला. गोरे यांनी या कर्मचाऱ्याला अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला, आपण येथे नव्हता, तर आपल्याला आम्ही येथे आल्याचे कसे कळाले. मात्र त्यावरही तो कर्मचारी काही बोलू शकला नाही. हो साहेब, नाही साहेब करून त्या कर्मचाऱ्याने त्या दिवसाची वेळ  मारून नेली. मात्र आजही तीनआसनी रिक्षातून प्रवास करताना मीटर डाऊन होत नाही, हेच सत्य आहे. वरिष्ठांनी दालनात नियम बनवायचे आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी करणाऱ्यांनी त्याच नियमांची पायमल्ली करायची असेच पावलोपावली चालल्याने मीटरचा सुटणारा प्रश्न अधिक गुंतत चालला आहे. त्यामुळेच काही वर्षांपासून रिक्षामीटरचा प्रश्न सोडवणारे अनेक सामाजिक कार्यकर्ते आता स्वत:च्या चारचाकी गाडीतून प्रवास करणे पसंत करतात. क्वचित रिक्षाप्रवास करायचा झाल्यास मनमानी भाडय़ासमोर नतमस्तक होऊन रिक्षाचालकांच्या हातात आपला खिसा देऊ करण्याची वेळ पनवेलकरांवर ओढवली आहे. पनवेलमध्ये तीनआसनी रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणे धावावे यासाठी एक कर्मचारी शंभर रिक्षाचालकांना कारवाईसाठी पुरेसा आहे का, ही बाजू पोलीस कर्मचाऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळते. त्यामुळे पनवेल शहरातून मीटरप्रमाणे रिक्षा धावत नाहीत.
येथे मीटरही नाही आणि बसही नाही..
मानसरोवर व खांदेश्वर रेल्वे स्थानकांमधील प्रवाशांची अवस्था पनवेलकरांहून बिकट आहे. येथे पोलीस उपायुक्तांचे आदेश असतानाही कर्मचारी उपस्थित राहत नाहीत. या दोनही रेल्वे स्थानकांतून कामोठे व खांदेश्वर नोडमध्ये जाण्यासाठी आजतागायत रिक्षांनी मीटर कधीच डाऊन केले नाही. शेअर रिक्षा या दोनही रेल्वे स्थानकांतून वसाहतीमध्ये चालतात, मात्र त्यातही भाडे प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमाप्रमाणे, मात्र तीनऐवजी पाच प्रवाशांची वाहतूक येथे राजरोसपणे पोलिसांच्या डोळ्यासमोर होते. पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारला की सर्व रिक्षा बंद करायच्या आणि प्रवाशांना पोलिसांकडे बोट दाखवायचे, असा पवित्रा येथील रिक्षाचालकांनी घेतला. पनवेल रेल्वे स्थानकाच्या बाहेरून एक एनएमएमटी कोपरखैरणेसाठी धावते. मात्र खांदेश्वर आणि मानसरोवर या रेल्वे स्थानकाच्या परिसरात बससेवा फिरू देणार नाही, असा पवित्रा या रिक्षाचालकांनी काही वर्षांपूर्वीच घेतला. वर्षे उलटली तरीही या पवित्र्याची दहशत आजही एनएमएमटी प्रशासनावर घट्ट बसली आहे. नेहमी एनएमएमटीचे व्यवस्थापक नेहमी ही बससेवा सुरू करण्याचे आश्वासन देत पोलीस संरक्षणाचे कारण पुढे करतात.
एनएमएमटीच्या वतीने व्यवस्थापक शिरीष आधारवड यांनी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर कामोठे येथे बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी पोलीस संरक्षणाची त्यांना गरज होती. याअगोदरच या व्यवस्थापकांना वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजय पाटील व पनवेलचे सहायक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी यापूर्वीच आपण बससेवा सुरू करा, आम्ही संरक्षण पुरवू, असे लेखी पत्र दिले आहे. मात्र राजकीय पक्षातील नेत्यांसारखी एनएमएमटीला लोकहितासाठी टोलवाटोलवी का करावी लागते, हे संभ्रमात टाकणारे आहे. कोणाच्या भीतीने, आदेशाने ही लोकहिताची बससेवा सुरू होत नाही, हे स्पष्ट करायला एनएमएमटी तयार नाही. यामुळे कळंबोली, खांदेश्वर, तळोजा एमआयडीसी, कामोठे, नावडे या वसाहतींमधील सुमारे दीड लाख प्रवासी रोज घुसमटून प्रवास करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा