महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १२ फेब्रुवारीच्या राज्यभरातील ‘रास्ता रोको’ आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना फौजदारी व्यवहार संहिता कलम १४९ प्रमाणे नोटिसा पाठविल्या असून १२ फेब्रुवारी रोजी गुन्हा घडल्यास त्या व्यक्तीच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
राज ठाकरे प्रथमच या आंदोलनानिमित्त रस्त्यावर उतरणार आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. आंदोलनामुळे पोलीस यंत्रणा दक्ष झाली आहे. या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर मुंबई पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. मनसेच्या नेत्यांना आंदोलनाच्या आदल्या रात्री ताब्यात घेतले जाणार आहे. तसेच शहरातील सर्व प्रमुख नाक्यांवर आणि रस्त्यांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. त्यासाठी सोमवारपासूनच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत.
सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये तसेच आंदोलन योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी योजना तयार केली जात आहे. मुंबईच्या प्रत्येक टोल नाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. मंगळवारी पोलीस जमावबंदीचा आदेश काढण्याचीही शक्यता आहे. वाहतूक पोलिसांनीही यासंदर्भात बैठका घेऊन आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
स्वत:च्या वाहनाने कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांमध्ये या आंदोलनाची धास्ती आहे. सकाळी मी माझ्या वांद्रे येथील कार्यालयात वडाळ्याहून गाडीने जाते. सकाळी ‘रास्ता रोको’ होण्याची भीती आहे. त्यामुळे मी लोकलने जाण्याचा विचार करत आहे, असे अनिता पाटील यांनी सांगितले. मनसेचे आंदोलन िहसक असते. आम्ही महाविद्यालयाचे मित्र लोणावळ्याला गाडीने एक दिवसाच्या पिकनिसाठी बुधवारी जाणार होतो. पण या आंदोलनामुळे आम्ही पिकनिक एक दिवस पुढे ढकलली आहे, असे दादरच्या अनिकेत सावंत याने सांगितले.