राज्यभर सुरू असलेल्या पोलीस भरतीत महिला उमेदवार मोठय़ा प्रमाणात सहभागी झाल्याने पोलीस खात्यात महिलांना चांगल्या संधी असल्याचा महिलांचा विश्वास स्पष्ट झाला आहे.
सध्या राज्यभर पोलीस भरतीची प्रक्रिया अतिशय कडक आणि पारदर्शीपणे होत आहे. उमेदवारांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्याची व्यवस्था काही प्रमाणात बिघडल्याने शारीरिक चाचणी परीक्षेसाठी पहिल्या दिवशी हजर राहू न शकणाऱ्यांना दुसऱ्या दिवशी संधी देण्यात आली. यवतमाळ जिल्ह्य़ात पोलीस शिपायांच्या ३०० जागांसाठी ६५०० वर उमेदवार रखरखत्या उन्हात परीक्षा देत आहेत. विशेषत: महिलांसाठी राखीव असलेल्या ९९ जांगासाठी १७५० महिला उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. त्यापकी एक हजार महिला उमेदवारांनी शारीरिक चाचणी परीक्षा दिली.
महिला उमेदवारांनाही पुरुष उमेदवारांप्रमाणे शंभर मीटर धावणे, गोळाफेक आणि लांब उडी, अशा चाचण्या द्याव्या लागत आहेत. या चाचण्या व लेखी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर सेवेत भरती झालेल्या महिला पोलिसांना विभागीय परीक्षा देऊन पोलीस उपअधीक्षक पदापर्यंत जाण्याची संधी प्राप्त होऊ शकते आणि बऱ्याच महिलांनी ही संधी घेतल्यामुळे महिलांमध्ये पोलीस खात्यात जाण्यासाठी चांगलीच स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी देत असतांना सहा तरुणी भोवळ येऊन पडल्या तरीदेखील हिंमत न हारता ग्लुकोज पाणी पिऊन व प्राथमिक उपचार घेऊन त्या घरी गेल्या. मात्र, तयारी करून पोलीस खात्यात सेवेची संधी मिळवू, असा आत्मविश्वासही व्यक्त करून त्यांनी ‘बचेंगे तो और लढेंगेचा’ जणू दिलेला संदेश पुरुष उमेदवारांनाही प्रोत्साहित करणारा ठरला.

Story img Loader