आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी सात्विक ग्रूप ऑफ इन्व्हेस्टमेंटच्या अमोल ढाकेसह सहा संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अमोल ढाके, श्रीमती अमोल ढाके, महेंद्र कोहाड, अतुल दीक्षित, संदीप महाजन व मोहन जोशी ही आरोपी संचालकांची नावे आहेत. आरोपींनी सात्विक ग्रुप ऑफ इन्व्हेस्टमेंट कंपनीची स्थापना केली. अमरावती मार्गावरी भरतनगरातल्या पुराणिक लेआऊटमध्ये या कंपनीचे प्रमुख कार्यालय आहे. आरोपींनी ठेवींवर आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखविले. त्यास भुलून अनेक गुंतवणूकदारांनी आयुष्याची कमाई त्यात गुंतवली. त्यावर काही दिवस आरोपींनी व्याजही दिले. परतव्यासंबंधी हमीपत्र, तसेच धनादेशही त्याने दिले. मात्र, त्यानंतर गुंतवलेली रक्कम देण्यास त्यांनी टाळाटाळ सुरू केली. धनादेशही वटले नाहीत. अशाप्रकारे एकूण ३३ लाख १४ हजार रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार संजय प्रकाश काशीकर (रा. कर्नलबाग) यांच्यासह पंधरा गुंतवणूकदारांनी अंबाझली पोलीस ठाण्यात केली. डिसेंबर २००५ ते एप्रिल २०१४ दरम्यान हा प्रकार घडला.
पोलिसांनी याप्रकरणी आरोपी संचालकांविरुद्ध भारतीय दंडविधानाचे कलम ४२० व ४०६, तसेच महाराष्ट्र ठेवीदार हक्क संरक्षण कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे जाऊ शकतो.