लोकसभेच्या मतदानासाठी नाशिक मतदारसंघात पोलिसांनी केलेल्या सूक्ष्म नियोजनामुळे गंभीर अशा घटना घडल्या नाहीत. पोलिसांनी ठेवलेला कडक बंदोबस्त आणि राजकीय हस्तक्षेप न जुमानता करण्यात आलेली कारवाई यास त्याचे श्रेय द्यावे लागेल. मतदानाच्या आदल्या दिवसापासून मतदान पूर्ण होईपर्यंत पोलिसांनी तहानभूक विसरून योग्य पध्दतीने बंदोबस्त ठेवल्याने सर्वसामान्य मतदार निर्भयपणे मतदानासाठी बाहेर पडले. यावेळच्या निवडणुकीत नाशिक मतदारसंघात सुमारे १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. निवडणूक आयोगासह विविध संस्था, संघटनांकडून मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून करण्यात आलेल्या प्रयत्नांसह पोलिसांच्या नियोजनासही त्याचे श्रेय द्यावे लागेल.
वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून करण्यात येणारे प्रयत्न आणि तरीही घडणारे गुन्हे कायम चर्चेत असतात. अशा चर्चेत पोलिसांवर टीकाच अधिक केली जाते. पोलिसांकडून करण्यात येणारे प्रयत्न दुर्लक्षितच राहतात. राजकीय हस्तक्षेपाला तोंड देत त्यांना कार्य करावे लागते. पोलिसांनी थोडी जरी नमती भूमिका घेतली. तर, त्याचा त्यांनाच कसा त्रास होतो. हे अलीकडेच बेशिस्त रिक्षाचालकांकडून वाहतूक पोलिसांना झालेल्या मारहाणीच्या दोन-तीन घटनांमधून दिसून आले. या पाश्र्वभूमीवर नाशिक शहरात लोकसभा निवडणुकीचे मतदान शांततापूर्वक पार पाडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.
या मतदारसंघात आघाडी, महायुती आणि मनसे या तिघा उमेदवारांमध्ये असलेली चुरस, त्यांच्यामागे असलेले पाठबळ लक्षात घेता मतदानाच्या दिवशी तणाव निर्माण होण्याची शक्यता अधिक होती. त्यातच जुन्या नासिक भागात पैसे वाटप होत असल्याच्या तक्रारी आधीच येऊ लागल्या होत्या. असे असतानाही पोलिसांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे कुठेही फारशी गडबड झाली नाही. ज्यांनी पैसे वाटप करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांना त्याक्षणी पोलिसी खाक्याचा अनुभव घ्यावा लागल्याने इतरांनी त्यातून बोध घेत फारशी हालचाल केली नाही. सिडकोत मतदान केंद्राच्या परिसरात अवैधपणे वाहन उभे केल्याच्या कारणावरून पोलीस अधिकाऱ्यांशीच उर्मटपणे वागणाऱ्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यास ताब्यात घेऊन पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा संदेश दिला. पोलिसांच्या या कठोर भूमिकेमुळे बनावट मतदान करण्याच्या प्रकारास आळा बसला. राजकीय वरदहस्त असलेल्या गुंडांना पोलिसांनी मतदानाच्या आधीच ताब्यात घेतल्याने मतदानाच्या दिवशी त्यांचे बरेचसे काम हलके झाले होते. मतदानाच्या दिवशी काही केंद्रांबाहेर बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांना पाणी मिळणेही कठीण झाले होते. तरीही त्यांनी दिवसभर नेटाने आपले कर्तव्य पार पाडल्याने मतदारांनी निर्भयपणे मतदान केले.