ठाणेकरांना एखाद्या गुन्ह्य़ाच्या तक्रारीसाठी आता पोलीस ठाण्यात खेटे घालण्याची गरज पडणार नाही. त्याऐवजी घराजवळील चौकीतच त्यांना त्यांची तक्रार दाखल करण्याची व्यवस्था ठाणे पोलीस आयुक्तालयाने उपलब्ध करून दिली आहे. तक्रारदाराचे अर्ज चौकीत स्वीकारले जातील, मात्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मुख्य पोलीस ठाण्यातच उरकली जाईल. विशेष म्हणजे, पोलीस ठाण्यामध्ये ज्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नियुक्ती केली जाते, त्याच धर्तीवर या चौक्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी तैनात केला जाणार आहे. हा अधिकारी संबंधित पोलीस चौकीचा प्रमुख असेल, अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे.
वाढत्या गुन्हेगारीला पायबंद बसावा तसेच नागरिकांना तात्काळ पोलीस सेवा उपलब्ध व्हावी यासाठी ठाणे पोलिसांनी संपूर्ण आयुक्तालयातील सुमारे १०० पेक्षा अधिक चौक्या २४ तास कार्यरत करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी या चौक्या रात्री ठरावीक वेळेनंतर बंद होत असत. त्यामुळे एखादी मोठी तक्रार घेऊन तक्रारदाराला पोलीस ठाण्याची पायरी चढण्याशिवाय गत्यंतर नसायचे. काही वेळा पोलीस चौक्यांमध्ये तक्रारदार गेले, तर तेथे तक्रार नोंदविण्याची व्यवस्था नसायची. या चौक्या केवळ गस्तीसारख्या कामासाठी उपयोगात आणल्या जात असत. यापुढे या चौक्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी आणि आठ ते दहा शस्त्रधारी कर्मचारी तैनात करण्यात निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवसांपासून वागळे परिमंडळातील कोपरी, वागळे तसेच घोडबंदर भागातील १६ चौक्या अशा प्रकारे कार्यरत झाल्या आहेत. विशेष म्हणजे, चौकीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना हद्दीतील गुन्ह्य़ांचा तपास करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. गंभीर गुन्ह्य़ाचा तपास संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी करणार आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यातील कामाचा भार काहीसा हलका होण्याची चिन्हे आहेत.
ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांत सुमारे शंभरहून अधिक चौक्या असून त्यापैकी कित्येक चौक्या गेल्या काही वर्षांपासून धुळखात पडलेल्या अवस्थेत आहेत. सोनसाखळी चोरी, घरफोडी, मारामारी, अशा गुन्ह्य़ांमध्ये वाढ होऊ लागली असून त्याचा सर्वाधिक ताण पोलीस ठाण्यांवर पडू लागल्याचे चित्र आहे.
तसेच सोनसाखळी चोरीच्या घटनेची माहिती उशिरा पोलिसांपर्यंत पोहचते. बहुतेक नागरिकांना पोलीस ठाणे कुठे आहे, याविषयी माहिती नसते. या पाश्र्वभूमीवर शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच नागरिकांना तात्काळ पोलीस सेवा मिळावी, या उद्देशाने ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी सर्वच चौक्यांमध्ये शस्त्रधारी अधिकारी-कर्मचारी नेमून २४ तास कार्यरत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, वागळे, ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर या पाचही परिमंडळांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौक्यांची पाहाणी करून त्या कार्यरत करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी वागळे परिमंडळाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी कोपरी, वागळे आणि घोडबंदर भागांतील १६ चौक्यांमध्ये शस्त्रधारी पोलीस तैनात करून चौक्या कार्यरत केल्या आहेत. या चौक्यांमध्ये वायरलेस यंत्रणाही लवकरच बसविण्यात येणार आहे. या वृत्तास पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दुजोरा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तपास चौकीतील अधिकारी करणार
चौकीच्या हद्दीतील स्थानिक गुन्हेगार, सोनसाखळी चोर, सराफाची दुकाने, पतसंस्था, बँका, ज्येष्ठ नागरिक आणि सी.सी. टीव्ही कॅमेरे आदींची माहिती चौकीतील अधिकारी-कर्मचारी यांच्याकडे असणार आहे. तसेच हद्दीतील गुन्हे आणि अर्जाचा तपास चौकीतील अधिकारी तसेच कर्मचारी करतील. गंभीर तसेच महत्त्वाच्या गुन्ह्य़ांचा तपास संबंधित पोलीस ठाणे करील, अशी माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. वाढत्या गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी तसेच नागरिकांना तात्काळ पोलीस सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी या चौक्या कार्यरत केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

तपास चौकीतील अधिकारी करणार
चौकीच्या हद्दीतील स्थानिक गुन्हेगार, सोनसाखळी चोर, सराफाची दुकाने, पतसंस्था, बँका, ज्येष्ठ नागरिक आणि सी.सी. टीव्ही कॅमेरे आदींची माहिती चौकीतील अधिकारी-कर्मचारी यांच्याकडे असणार आहे. तसेच हद्दीतील गुन्हे आणि अर्जाचा तपास चौकीतील अधिकारी तसेच कर्मचारी करतील. गंभीर तसेच महत्त्वाच्या गुन्ह्य़ांचा तपास संबंधित पोलीस ठाणे करील, अशी माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. वाढत्या गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी तसेच नागरिकांना तात्काळ पोलीस सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी या चौक्या कार्यरत केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.