आधीच्या अधीक्षकांनी शासकीय बंगला अजूनही खाली केला नसल्यामुळे विद्यमान ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांच्यावर घरासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. मुंबईहून आणलेले आपले सर्व साहित्य पोलीस मुख्यालयामध्ये ठेवून त्यांना सध्या भाडय़ाच्या घरात रहावे लागत आहे.
पाषाण रस्त्यावर ग्रामीण पोलीस अधीक्षकांना ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळच ‘सिंहगड’ नावाचे अधिकृत निवासस्थान आहे. लोहिया यांनी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात ग्रामीण पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला. मात्र, सिंहगड बंगला अद्याप पूर्वीचे ग्रामीण अधीक्षक शहाजी सोळुंखे यांनी खाली केला नसल्यामुळे ते एक महिन्यांपासून कुटुंबासह गेस्टहाऊसवर राहत आहेत.
ते राहत असलेले गेस्ट हाऊस ४ सप्टेंबरपासून दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी आरक्षित केल्यामुळे त्यांना आता एका भाडय़ाच्या सदनिकेत राहावे लागत आहे.
पुणे ग्रामीण अधीक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी मुंबई येथील शासकीय घर खाली करून आपले सर्व साहित्य पुण्यात घेऊन आले. मात्र, येथील ग्रामीण अधीक्षकांचा बंगला पूर्वीच्या अधीक्षकांनी खाली न केल्यामुळे आपले सर्व साहित्य पोलीस मुख्यालयात ठेवून ते एका सदनिकेत राहत आहेत. सदनिका शोधण्यासाठी त्यांना बराच आटापिटा करावा लागला. ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळ असलेल्या बंगल्यातून तत्काळ कोणतेही काम करण्यासाठी पोहोचता येते. मात्र, त्यांना भाडय़ाच्या सदनिकेत व लांब राहावे लागत असल्यामुळे त्यांना काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
जून महिन्यात गृह खात्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यामध्ये पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी सोळुंखे यांची पदोन्नतीने शहर पोलीस दलात अपर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी असलेले पूर्वीचे अपर पोलीस आयुक्त अनंत शिंदे यांची बदली नागपूरला करण्यात आली. पुणे ग्रामीण अधीक्षक म्हणून लख्मी गौतम यांची सुरुवातील नेमणूक करण्यात आली होती. मात्र, त्यांची बदली रद्द केल्यामुळे ग्रामीण अधीक्षक पदाची जबाबदारी सोळुंके यांनी १४ जुलै रोजी अपर पोलीस अधीक्षक विजय मगर व प्रवीणसिंग परदेशी यांच्याकडे सोपवून शहर अपर पोलीस आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. मात्र, अनंत शिंदे यांनी अद्यापही पुण्यातील अपर पोलीस आयुक्तांचा बंगला खाली न केल्यामुळे सोळुंके यांनी ग्रामीण अधीक्षकाच्या बंगल्याचा ताबा सोडलेला नाही. त्यामुळे नवीन ग्रामीण पोलीस अधीक्षकांना अद्याप त्यांचे शासकीय निवासस्थान मिळालेले नाही.

Story img Loader