ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी वरवरच्या तक्रारीवरून या प्रकरणातील एका संशयित तरुणाला पोलीस कोठडीत डांबले. पण घटनेच्या दिवशी हा तरुण कामावर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रारीची पुरेशी खातरजमा केली नसल्यामुळे तरुणाच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. याप्रकरणी ‘त्या’ तरुणाच्या पत्नीने राज्याचा गृह विभाग आणि ठाणे पोलीस आयुक्त के.पी. रघुवंशी यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे या प्रकरणावरून वर्तकनगर पोलीस चांगलेच गोत्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
विनोद अधिकराव शिंदे असे या तरुणाचे नाव असून तो सावरकरनगर येथील शिवाजीवाडी भागात राहतो. याच परिसरात राहणारे बाळा केंद्रे यांना २० ऑक्टोबर रोजी कामगार हॉस्पिटल भागात मारहाण झाली होती. केंद्रे राहात असलेली तसेच आसपासची जागा वन खात्याची असून ‘त्या’ जागेच्या पुनर्वसनाच्या वादातून त्यांना ही मारहाण झाली होती. या प्रकरणी त्यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दहाजणांविरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर त्यांनी २९ ऑक्टोबर रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात आणखी एक तक्रार दाखल केली. त्यामध्ये २८ ऑक्टोबरला रात्री घराला कुलूप लावून कुंटुंबीयांना कोंडण्यात आले होते आणि दरवाजाला रॉकेलचा वास येत होता, असे म्हटले होते. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. तसेच या प्रकरणी शिवाजीवाडीतील नऊ जणांवर संशय व्यक्त करून त्यांची नावे पोलिसांना दिली होती. त्यामध्ये विनोद शिंदे याच्या नावाचा समावेश होता. दरम्यान, वर्तकनगर पोलिसांनी केंद्रे यांच्या तक्रारीची दखल घेत विनोद यास अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे ठाणे कारागृहात बंदिस्त आहे.
पोलीस गोत्यात..
विनोद शिंदे एका खासगी टूर्स अ‍ॅण्ड ट्रॉव्हल्सच्या कंपनीत काम करीत असून ज्या दिवशी घटना घडली, त्या दिवशी शिंदे रात्रपाळीला कामावर होते. या संबंधीचे सर्व पुरावे विनोद यांची पत्नी समिद्रा यांनी वर्तकनगर पोलिसांना नुकतेच सादर केले आहेत. मात्र पोलिसांनी या प्रकरणाची पुरेशी खातरजमा केली नसल्यामुळे ७ डिसेंबरपासून ते कारागृहात बंदिस्त आहेत. याच पाश्र्वभूमीवर समिद्रा शिंदे यांनी राज्याचा गृहविभाग आणि पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे वर्तकनगर पोलीस चांगलेच अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. या संदर्भात, वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बंगाळे यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रकरणी दहाजणांविरोधात गुन्हा दाखल असून नावानिशी तक्रार असल्यामुळे विनोदला अटक केली आहे. मात्र या प्रकरणात नेमके काय झाले आहे, याविषयी माहिती घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Story img Loader