धंतोलीतील ताकिया झोपडपट्टीतील महिलांमध्ये खदखदणाऱ्या असंतोषाची धग आता जाणवू लागली असून नागपुरात ‘अक्कू यादव’ प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता दिसू लागली आहे. झोपडपट्टीमधील सर्वसामान्य नागरिकाच्या तक्रारीला पोलीस ठाण्यात तुच्छतेची वागणूक मिळत असून गुंड शिरजोर झाल्याचे स्पष्ट चित्र गेल्या दोन दिवसातील उद्रेकातून स्पष्ट झाले. हाती नंग्या तलवारी घेऊन हैदोस घालणाऱ्या बुरखाधारी गुंडांपैकी एखादा हाती सापडल्यास त्याचा ‘अक्कू यादव’ केला जाईल, एवढी मानसिक तयारी वस्तीतील महिलांनी केली आहे.
सीताबर्डीवरील वसंतराव नाईक झोपडपट्टीतील इक्बाल गुंडाचा जमावाने खात्मा करण्याच्या प्रकरणाची धग अजून विझलेली नाही. नागरिकांनी कायदा हातात घेतल्यानंतर पोलिसांना जाग आली आणि कुख्यात गुंड भुरू व त्याच्या साथीदारांना गजाआड केले गेले. पोलीस त्यातून धडा घेतील, असे वाटू लागले असतानाच तकिया झोपडपट्टीचे प्रकरण पुढे आले. गुंडांविरुद्ध आलेल्या तक्रारी पोलीस सहजपणे घेतात, शहरात दुसरे अक्कू प्रकरण व्हावे, अशी पोलिसांची भूमिका दिसते, असे वाटू लागल्याचे अनेक नागरिकांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. अनेक गुंडांविरुद्ध हद्दपार, मोक्का, एमपीडीए आदी कारवाया केल्या असल्या आधीच त्याच्या मुसक्या का आवळल्या जात नाहीत, असे सवाल या नागरिकांनी केला.
धंतोली पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तकिया व सरस्वतीनगर या जुळ्या झोपडपट्टीमधील नागरिक गेल्या पंधहा दिवसांपासून बुरखाधारी गुंडांच्या हैदोसामुळे त्रस्त आहेत. या गुंडांची मजल कोणाच्या घरात घुसून तरुण मुलींना उचलून नेण्याएवढी वाढली आहे. महिलांचा विनयभंग, छेडखानी अगदी रोजची घटना झाली आहे. एवढय़ा गंभीर घटना पोलिसांनी अगदी सहजपणे घेतल्याने असंतोषाचा मंगळवारी भडका रात्री उडाला. वस्तीतील महिलांनी त्यांच्यावरील आपबीती नगरसेवक संदीप जोशी यांना सांगितली तेव्हा त्यांनाही धक्काच बसला. संदीप जोशी बुधवारी नागरिकांसह धंतोली पोलीस ठाण्यात गेले. एवढय़ा मोठय़ा संख्येने नागरिकांचा जमाव आल्यानंतरही पोलीस बघ्याची भूमिका घेत नुसते उभे होते. ‘त्यांच्यापैकी चार-पाच लोकांना आत बोलवा आणि विचारा’ असे काहींनी पोलीस निरीक्षकांना सुचविले तेव्हा कुठे त्यांनी संदीप जोशी यांच्यासह चार-पाचजणांना आत बोलावले.
‘आम्हाला दिसत नाही तुम्हाला दिसले तर तुम्ही पकडून आणा’ अशी उत्तरे पोलिसांकडून दिली जात असल्याचे ठाणेदाराच्या लक्षात आणून देण्यात आले. नागरिकांचा खदखदत असलेला असंतोष संदीप जोशी यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांनी कारवाईची तयारी केली. गस्त घालण्यासाठी त्यांनी वस्तीमधील नागरिकांची मदतीची अपेक्षा केली आणि त्यास नागरिकांनीही सहमती दर्शविली. मुळात गेल्या पाच दिवसांपासून महिलांनी गुंडांविरोधात सातत्याने तक्रारी केल्या. मधल्या काळात एका उपनिरीक्षकाची रात्रपाळी होती आणि तकियामधील प्रकार समजल्याने त्याने एका शिपायासह गस्त घातली. मात्र, झोपडपट्टीमधील तक्रार असल्याने अधिकाऱ्यांनी ती गांभीर्याने घेतलीच नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी स्वत: त्या वस्तीत जायला हवे होते. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कळविले नाही. गुंडांविरुद्धच्या कारवाईबाबतची नरमाई असंतोषात भर घालत आहे. नागरिकांचा मोर्चा ठाण्यात आल्यावर सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त किंबहुना अतिरिक्त पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त व पोलीस आयुक्तांनी किंवा त्यांच्यापैकी एकाने तेथे जावयास हवे होते. मात्र, असे झाले नाही. झोपडपट्टय़ांमधील वाढत्या उद्रेकाने पोलीस यंत्रणा मात्र चांगलीच हादरली आहे.
ताकियातील उद्रेकाने पोलीस यंत्रणा हादरली
धंतोलीतील ताकिया झोपडपट्टीतील महिलांमध्ये खदखदणाऱ्या असंतोषाची धग आता जाणवू लागली असून नागपुरात ‘अक्कू यादव’ प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता दिसू लागली आहे. झोपडपट्टीमधील सर्वसामान्य नागरिकाच्या तक्रारीला पोलीस ठाण्यात तुच्छतेची वागणूक मिळत असून गुंड शिरजोर झाल्याचे स्पष्ट चित्र गेल्या दोन दिवसातील उद्रेकातून स्पष्ट झाले.
First published on: 12-07-2013 at 09:31 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police system gets the shock because of incident in takiya