‘अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पुनर्मूल्यांकनामध्ये गुणांची वाढ केल्याप्रकरणी पोलिसांनी उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांची यादी मागवली असून, त्यापैकी कुणी दोषी आढळल्यास त्या शिक्षकांवर कडक कारवाई केली जाईल’’, असे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले.
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर पुनर्मूल्यांकनामध्ये गुण वाढवून देऊन त्यांना उत्तीर्ण करणाऱ्या विद्यापीठाच्या तीन कर्मचाऱ्यांना चतु:शृंगी पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती. या सर्व प्रकारामध्ये उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांचाही सहभाग असल्याची शक्यता व्यक्त होत होती. त्याबाबत डॉ. गाडे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘या प्रकरणाच्या चौकशीमध्ये पोलिसांना सर्व सहकार्य देण्यात येत आहे. पोलिसांनी उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांच्या नावाची यादी विद्यापीठाकडे मागितली होती. त्याप्रमाणे विद्यापीठाने ती पोलिसांना दिली आहे. पोलीस चौकशी करत आहेत. या प्रकरणामध्ये जी नावे पुढे येतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार परीक्षा विभागाच्या कामकाजामध्येही बदल केले जात आहेत. परीक्षा विभागाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप कमी करण्यासाठी कामकाजाचे संपूर्ण ऑटोमेशन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. येत्या दीड ते दोन वर्षांमध्ये ऑटोमेशनची प्रक्रिया पूर्ण होईल.’’
विद्यापीठातील बदल्यांचे सत्र सुरूच
विद्यापीठातील बदल्यांचे सत्र असून सुरूच असून उपकुलसचिव आणि सहायक कुलसचिव पदावरील अधिकाऱ्यांच्या बुधवारी बदल्या करण्यात आल्या. एकूण ७ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विद्यापीठातील ५४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या मंगळवारी करण्यात आल्या होत्या.

Story img Loader