राजकीय दबाव झुगारून तीस कोटी रुपयांच्या घरकूल घोटय़ाळ्याचा निर्भयतेने तपास करून सतत नऊवेळा आमदार राहिलेल्या एका नेत्यासह ९० राजकीय लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे धाडस दाखविणारे पोलीस अधिकारी इशू सिंधू नागपुरात बदलून येत आहेत.
नवी दिल्लीच्या बंसराज महाविद्यालयात शिकलेले इशू सिंधू भारतीय पोलीस सेवेच्या २००७च्या तुकडीचे अधिकारी आहेत. २०१२ मध्ये ते जळगाव जिल्ह्य़ाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले. जळगावमध्ये शासनाच्या घरकूल योजनेत तीस कोटी रुपये घोटाळा झाल्याची तक्रार २००६मध्ये एका आयएसएस अधिकाऱ्याने केली होती. तेव्हापासून एकाही पोलीस अथवा प्रशासकीय अधिकाऱ्याने या प्रकरणाचा गंभीरतेने तपास अथवा चौकशी केली नसल्याचे सिंधू यांना आढळून आले. सहा वर्षांपासून धूळखात पडलेल्या या प्रकरणाचा इशू सिंधू यांनी तपास सुरू केला. केवळ पोलीसच नव्हे तर विविध शासकीय खाती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांतून त्यांनी चौकशीचा तसेच पुरावे गोळा करण्याचा धडाका सुरू केला. त्यात त्यांना भरपूर अडथळे आले.
या प्रकरणात तेथून सतत नऊवेळा आमदार राहिलेले सुरेशदादा जैन, विद्यमान परिवहन मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह ९० राजकारण्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यावर सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर यांना अटक करण्यात आली. ही राजकीय खेळी असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणातील सहभाग नाकारला. या प्रकरणाचा तपासात सिंधू यांच्यावर प्रचंड राजकीय दबाव आला. तरीही या दबावास भिक न घालता सिंधू यांनी कारवाई केली. त्यानंतर प्रदीप रायसोनी, भुसावळचे संतोष चौधरी यांनाही अटक झाली ती सिंधू यांच्या काळात. खऱ्या अर्थाने कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या सिंधू यांची नंतर औरंगाबाद ग्रामीणच्या अधीक्षकपदी बदली झाली. आता ते नागपुरात येत आहेत.
घोटाळेबाजांवर अंकुश ठेवणाऱ्या इशू सिंधूंची नागपुरात बदली
राजकीय दबाव झुगारून तीस कोटी रुपयांच्या घरकूल घोटय़ाळ्याचा निर्भयतेने तपास करून सतत नऊवेळा आमदार राहिलेल्या एका नेत्यासह ९० राजकीय लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे धाडस दाखविणारे पोलीस अधिकारी इशू सिंधू नागपुरात बदलून येत आहेत.
First published on: 05-08-2014 at 08:35 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police transfer