पोलिस स्टेशन म्हणजे एक कोठडी असते आणि तेथे गेल्यावर आपल्याला थेट कोठडीतच टाकले जाते. पोलिस काकापुढे उभे राहिले की तो आपल्याला बेडय़ाच ठोकतो असे एकाहून एक गंमतीदार समज शाळकरी मुलांच्या मनात होते. पण, पोलिस म्हणजे एक सामान्य माणूस असतो. त्यांच्या घरीही लहान मुले, कुटुंब असते. पोलीस तुमचे संरक्षण करीत असतात. त्यामुळे पोलिस काकांना घाबरण्याचे कारणच नाही..असा संदेश डोंबिवलीत दक्ष नागरीक संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
लहान मुलांच्या मनातील पोलिसांबद्दलची भीती कमी व्हावी आणि त्यांचा संवाद वाढावा, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु झालेल्या या संवादात सुरुवातीला पाचवी ते आठवी इयत्तेतील विद्यार्थी धास्तावल्याचे चित्र होते. मात्र जसजसा हा संवाद रंगत गेला तेव्हा पोलीस अधिकाऱ्यांना घाबरणारी ही मुले त्यांचा उल्लेख काका असा करु लागले.
डोंबिवलीतील दक्ष नागरिक संघ, सर अकादमीने पोलिसांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘सुसंवादातून परिवर्तन’ कार्यक्रमात पोलीस आणि लहान मुलांमधील हा आगळावेगळा संवाद पहावायास मिळाला. डोंबिवलीत सतत घडणाऱ्या विनयभंग, बलात्काराच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमाचे सर अकादमीत आयोजन केले होते. साहय्यक पोलिस आयुक्त राजन घुले, विष्णुनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्त्यां शिल्पा कशेळकर, दक्ष नागरिक संघाचे विश्वनाथ बिवलकर, डॉ. स्वाती गाडगीळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुलांना कोणी छेडाछेडी करीत असेल, रस्त्याने जाताना विनयभंग करण्याचा प्रयत्न करीत असेल, एखाद्या मुलीवर सामूहिक बलात्काराचा प्रयत्न होत असेल तर अशावेळी घटनास्थळी कसे वागायचे, याचे धडे अधिकाऱ्यांनी दिले. हे सादरीकरण पाहिल्यानंतर मुला, मुलींनी आपले अनुभवही यावेळी सांगितले. काही मुलींनी घरी जाताना मुले आपली छेडछाड करीत असतात असे सांगितले.
शिबीरात पोलिस काकांसमोर बोलण्यास घाबरणारी मुले उठून आपल्या अडचणी सांगू लागली. पोलिस काकांना थेट फोन केला तर चालेल का? ते आमचे ऐकतील का? असे प्रश्न करणाऱ्या शाळकरी मुलांना तातडीने विष्णुनगर पोलिस ठाण्याचे दूरध्वनी, बीट मार्शलचे मोबाईल देण्यात आले. राजन घुले तसेच राजेंद्र कुलकर्णी यांनी तुमच्या भोवती कोणताही प्रसंग घडला तर थेट पोलिस ठाण्यात येऊन आपणास भेटा. त्याचे निराकरण केले जाईल, असे सांगितले.
पोलीस काकांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
पोलिस स्टेशन म्हणजे एक कोठडी असते आणि तेथे गेल्यावर आपल्याला थेट कोठडीतच टाकले जाते. पोलिस काकापुढे उभे राहिले की तो आपल्याला बेडय़ाच ठोकतो असे एकाहून एक गंमतीदार समज शाळकरी मुलांच्या मनात होते.
First published on: 21-12-2012 at 11:57 IST
TOPICSजनजागृती
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police uncle talked with student