ऊस दरासाठी शेतकरी संघटनेचे संभाव्य आंदोलन लक्षात घेऊन पोलिस कर्मचा-यांना चोवीस तास मोबाइल सेवा कार्यरत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. साप्ताहिक सुट्टीच्या कालावधीत पोलिस ठाण्यापासून दहा मिनिटांच्या अंतरातच संपर्कात राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
ऊस दराचे आंदोलन सांगली जिल्ह्यात अधिक तीव्रतेने होत असल्याचा पूर्वानुभव लक्षात घेऊन हे आंदोलन हाताळण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून जिल्हा मुख्यालयाच्या क्रीडांगणावर पोलिसांनी मॉब डिस्पोजल करण्याचे प्रात्यक्षिक केले.  गर्दीकडून होणाऱ्या दगडफेकीपासून संरक्षण कसे करावे, लाठीचार्ज कसा करावा, दंगेखोरांना काबूत कसे आणावे यांची प्रात्यक्षिके क्रीडांगणावर झाली.  जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यातील किमान २५ पोलिस कर्मचा-यांना या प्रात्यक्षिकासाठी बोलावण्यात आले होते. वरिष्ठ अधिका-यांनाही आंदोलन हाताळण्याबाबत योग्य त्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. जाळपोळीनंतर आग आटोक्यात कशी आणावी. याचे प्रात्यक्षिक या वेळी सादर करण्यात आले. तसेच अश्रुधुराच्या नळकाडय़ांचा वापर कसा करायचा याच्याही सूचना कर्मचा-यांना देण्यात आल्या.
ऊस उत्पादकांचे आंदोलन लक्षात घेऊन सर्व पोलिस ठाण्याच्या नोटीस फलकावर कर्मचा-यांसाठी सूचना लिहिण्यात आल्या असून महिला कर्मचा-यांना पँटशर्टच्या वेशात हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच कर्मचा-यांनी हेलमेट व लाठीसह उपस्थित राहून रोज संध्याकाळी ९ वाजता पोलिस ठाण्यात हजेरीसाठी उपस्थित राहायचे आहे. याशिवाय कामानिमित्त कर्मचारी बाहेर गेला असल्यास मोबाइल चोवीस तास चालू ठेवावा. पोलिस ठाण्याकडून बोलावणे आले तर दहा मिनिटांत हजर व्हावे. अशा सूचना फलकावर लावण्यात आल्या आहेत.