मतदानाची घटिका समीप येताच झोपडपट्टय़ांमध्ये पैसे आणि दारू वाटपाला ऊत येत असतो. ठाणे शहरातील सुमारे ५१ टक्केनागरिक झोपडय़ांमध्ये राहतात. कल्याण, भिवंडी मतदारसंघांतही हे प्रमाण मोठे आहे. या पाश्र्वभूमीवर झोपडपट्टय़ांमधील हालचालींवर ‘नजर’ ठेवण्यासाठी पोलिसांनी यंदा खास पथके तयार केली असून कल्याण, भिवंडी या मतदारसंघांतही या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी आणण्यात येणाऱ्या पैशांची वाहतूक रोखण्यासाठी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात येत होती. त्यामध्येही गेल्या दोन दिवसांपासून वाढ करण्यात आली आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघांत मोठय़ा प्रमाणात झोपडपट्टय़ा असून त्याचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक आहे. ठाणे महापालिका हद्दीत हे प्रमाण ५१ टक्यांच्या घरात आहे. कोणतीही निवडणूक असो या वस्त्यांमधूनच मोठय़ा प्रमाणात मतदान होते, असा आजवरचा अनुभव आहे. या पट्टय़ातून होणाऱ्या एकगठ्ठा मतदानावर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा असतो. त्यामुळे या भागात पैसे, साडय़ा वाटणे, दारूचे वाटप करणे यांसारखे प्रकार वाढतात, असा अनुभव आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी या वस्त्यांमध्ये बैठका घेऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर अधिक भर दिला आहे. या वस्त्यांमधून सर्वाधिक मते आपल्या पारडय़ात पडावीत, याच दिशेने सर्वच उमेदवारांच्या प्रचाराची रणनीती दिसून आली. या वस्त्यांमधील मतदारांपर्यंत उमेदवार पोहोचत असले तरी हे मतदार आपल्यालाच मते देतील याविषयी उमेदवारांना खात्री नसते. त्यामुळे या मतदारांना आकर्षित करण्यासाठी कपडे, भेटवस्तू किंवा पैसे दिले जातात, असे पोलिसांच्या यापूर्वीच्या कारवाईतून उघड झाले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्येही अशा प्रकारे या वस्त्यांमधील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शक्यता पोलिसांना वाटते. त्यामुळे त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलिसांची पथके तयार केली असून ही पथके साध्या वेशात झोपडपट्टी वस्त्यांमध्ये फिरणार आहेत. तसेच या वस्त्यांमधील हालचालींवर बारीक लक्ष ठेवणार आहेत. मंगळवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून गुरुवारी मतदान होणार आहे. मात्र, मंगळवार आणि बुधवारी रात्री राजकीय पक्षांकडून झोपडपट्टी वस्त्यांमधील मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशांचे वाटप होण्याची शक्यता आहे. त्याच पाश्र्वभूमीवर ही पथके तयार करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मतदारांना वाटपासाठी आणण्यात येणाऱ्या पैशांची वाहतूक रोखण्यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
झोपडपट्टय़ांवर पोलिसांची नजर
मतदानाची घटिका समीप येताच झोपडपट्टय़ांमध्ये पैसे आणि दारू वाटपाला ऊत येत असतो. ठाणे शहरातील सुमारे ५१ टक्केनागरिक झोपडय़ांमध्ये राहतात.
First published on: 23-04-2014 at 07:32 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police watch on slums