न्यायमंदिरासमोरील दगडफेकीत पूर्व नागपूरचाही हात
जिल्हा न्यायमंदिरासमोरील रस्त्यावर दगडफेक करणाऱ्या जमावात पूर्व नागपुरातून लोक आणण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून या पडद्यामागील हालचालींचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
वसंतराव नाईक झोपडपट्टीत मोलमजुरी करणारे तसेच रिक्षा चालविणारे लोक राहतात. त्यात विशिष्ट प्रांतातील लोकांची संख्या मोठी आहे. तेथे अनेक वर्षांपासून आरोपी भुरू उर्फ शेख अक्रम शेख रहेमान (रा. आनंदनगर) व त्याचा भाऊ इकबाल यांची दहशत होती. या दोघांच्या अत्याचाराने कळस गाठला होता. तेथील त्रस्त नागरिकांच्या संतापाचा गेल्या वर्षी दहा ऑक्टोबरला उद्रेक झाला. रात्री झोपडपट्टीमधील महिला-पुरुषांचा जमाव दोघांच्याही मागे लागला. जिवाच्या आकांताने दोघेही पळत सुटले. पाठलाग करणाऱ्या जमावाच्या हाती इकबाल लागला. जमावाने त्याला बेदम मारहाण करीत ठेचून काढले. भुरू पळत थेट सीताबर्डी पोलीस ठाण्यात गेला तेव्हापासून तो कारागृहातच आहे. नागरिकांचा संताप अद्यापही शमलेला नाही. काल या घटनेसंदर्भातील न्यायालयीन कामकाजासाठी पोलिसांनी वसंतराव नाईक झोपडपट्टीमधील अकरा जणांना साक्षीसाठी बंदोबस्तात नेले. नंतर तेथे जमाव आला. आरोपी भुरूसह चार आरोपींना न्यायालयात आणले असता भुरूला ताब्यात घेण्याचा जमावाचा प्रयत्न होता.
काल सोमवारी तोडफोडप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी हनुमान सेनेचे चंद्रकांत गोपाळ कुंभारे (रा. इतवारी, लकडगंज), श्रेणीक घनश्याम मेहता यांच्यासह वीस आरोपींना, तसेच सदर पोलिसांनी काल या दोघांसह वीस आरोपींना अटक केली. जमावात अनेकांनी रॉकेलच्या बाटल्या आणि दगड खिशात भरून आणले असल्याची बाब पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही. जमावाने ज्याप्रकारे गोंधळ घातला आणि तोडफोड केली ते पाहता पूर्वतयारीने सर्व होत असल्याचेही लपून राहिले नाही. कालच्या घटनेत वसंतराव नाईक झोपडपट्टीमधील लोक कमी होते.
पूर्व नागपुरातून लोक आणण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. काही दिवसांपासून झोपडपट्टीत तयारी सुरू असल्याचे पोलिसांना दगडफेकीच्या घटनेनंतर समजले. भुरूबद्दलचा नागरिकांचा संताप ‘एन्कॅश’ करून तेथे ताबा मिळविण्याचा कुणी प्रयत्न करीत नाही ना, अशी शंका असून या पडद्यामागील हालचालींचा शोध घेतला जात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. काल दगडफेक झाल्यानंतर गुप्तचर आणि पोलिसांच्या विविध साईड ब्रॅंचची पथके तेथे धडकली आणि त्यांनी घटनेचा मागोवा घेतला. पडद्यामागे बरेच काही शिजले असल्याचा वास आल्याने विविध सुरक्षा यंत्रणांनी वरिष्ठ पातळीवरून कालच्या घटनेची माहिती घेतली गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police will investigate all hideing movements of stone attack
Show comments