अपघातात जप्त केलेली वाहने परत देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना इंदापूर पोलिस ठाण्यातील एका हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणी त्याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 सखाराम होनाजी डामसे (वय ५४, रा. नारायणगाव, ता. जुन्नर) असे अटक केलेल्या हवालदाराचे नाव आहे. या प्रकरणी व्यावसायिक सिद्दीक सलिम काझी (वय ३०, रा. गणेशनगर, वडगावशेरी) यांनी तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काझी यांचा वाहतुकीचा व्यवसाय असून ते भाडेतत्त्वावर ट्रक देतात.
१५ डिसेंबर रोजी त्यांच्या ट्रकचा इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात झाला. या अपघाताचा डामसे यांनी पंचनामा करण्यासाठी ट्रक ताब्यात घेतला. पण ट्रक परत करण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची मागणी डामसे यांनी ट्रकचा चालक गणेश सावंत यांच्याकडे केली. ‘अपघाताचा गुन्हा तुमच्यावर दाखल करायचा नसेल, तर मला पंचवीस हजार रुपये द्या, मी तुम्हाला यातून मोकळा करेन,’ असे डामसे यांनी काझींना फोनवर सांगितले. नंतर तडजोड करून डामसे यांनी ५ हजार रुपयांची मागणी केली.
डामसे लाच दिल्याशिवाय ट्रक परत देणार नाहीत याची खात्री झाल्यावर काझी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी १६ डिसेंबर रोजी सापळा रचून डामसे याना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे या अधिक तपास करत आहेत.