नवी मुंबई पोलीस दलातील वरिष्ठांच्या मर्जीतील ४० पोलीस शिपाई फक्त वरिष्ठांसाठी माया गोळा करण्यासाठी साध्या वेशात फिरत आहेत. भ्रष्टाचारी कारभाराचा हा शाप नवी मुंबईतील १७ पोलीस ठाणी, विविध वाहतूक विभाग तसेच थेट पोलीस आयुक्तालयातील सर्व कार्यालयांना लागला आहे. यातून नवी मुंबई पोलीस आयुक्तांचे कार्यालयही सुटलेले नाही.
नवी मुंबईत ४२०० पोलीस शिस्तीने आपले कर्तव्य बजावतात. त्यापैकीच हे ४० जण आहेत. यांना ओळखणे सोपे आहे. अंगात पाच ते सहा हजार रुपयांचा अत्तर मारलेला शर्ट, जिन्सची पॅन्ट आणि पायात वुडलॅण्डचे शूज असा त्यांचा पोशाख आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात हा पेहराव घालून ही मंडळी वावरताना दिसतात. यांनाच नवी मुंबई पोलीस दलाच्या भाषेत कलेक्टर असे म्हणतात.
या कलेक्टरांमुळे अनेक वर्षे अंगावर खाकी चढवून गुन्ह्य़ांचा तपास, छाती पुढे करून दिवसरात्र बंदोबस्त करणाऱ्या इमानी पोलिसांची छाती दोन इंच आत गेल्याची कळकळ काही सामान्य पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तीन वर्षांनी बदलतात, मात्र हे कलेक्टर अनेक वर्षांपासून त्याच पदावर प्रतीनियुक्तीचा आधार घेत विळखा मारून बसले आहेत. पोलीस आयुक्तालयातून त्यांची बदली झाल्यास, त्या बदल्या फिरवून पुन्हा त्याच पदावर विराजमान होण्याचे कलेक्टरांना वरदान पोलीस आयुक्तालयातून लाभते.
नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांवर तीन दिवसांपूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन आलेल्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांवर आपली छाप उमटवण्यासाठी या कलेक्टरांनी आपला जीव की प्राण एक केला आहे. साहेबांची राहण्याची व्यवस्था, डब्याची सोय, पोलीस ठाण्याच्या परिसरात जे आर्थिकस्रोत आहेत, अशा स्रोतांची अपडेट यादी अशी माहिती या कलेक्टरांनी पुरविल्याचे चित्र पोलीस ठाण्यांमध्ये पाहावयाला मिळते. महिन्याला आर्थिक स्रोतातून मिळालेल्या सिंडिकेट (महिन्याचा हप्ता) मधून पोलीस ठाण्यामधील येणाऱ्या पाहुण्यांना ज्युसची सोय, साहेबांचा आणि स्टाफचा भत्ता करण्याची प्रथा काही कलेक्टरांनी पारंपरिकरीत्या पाडली आहे. काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपण कलेक्टर प्रथेत नसल्याचे दाखविण्यासाठी आपल्या सारथीलाच (चालकाला) गणवेशात माया गोळा करण्याच्या कामाला नेमले आहे. कलेक्टरांच्या मायेची ही कक्षा पोलीस ठाण्यापासून ते मुख्यालयाच्या सुरक्षा, विशेष शाखा आणि पोलीस आयुक्तांच्या कार्यालयांपर्यंत रुंदावली आहे. कलेक्टरांच्या या संस्कृतीला अनेक वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आळा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र लाच घेताना फक्त कलेक्टरच अडकतो. यातून काही पोलिसांनी बोध घेऊन या संस्कृतीला रामराम ठोकला आहे.  
नवी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी भ्रष्टाचाराच्या पाठीत धोटा मारीत, अशा कलेक्टरांना पोलीस आयुक्तालयात अचानक तैनातीचे आदेश दिले होते. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे कलेक्टर त्यानंतर काही दिवस पोलीस आयुक्तालयात तैनातीला होते. तैनातीदरम्यान या कलेक्टरांना चड्डी, बनियान परिधान करून कवायती आणि बागकाम करण्याचे काम देण्यात आले. याचदरम्यान नवी मुंबईत चोरांच्या चड्डी-बनियान टोळीने घरफोडीचा उच्छाद मांडला होता. त्यामुळे पोलीस दलातील आणि चोरांच्या चड्डी-बनियान टोळ्या गाजल्या होत्या. २० दिवसांनंतर या कलेक्टरांना पोलीस आयुक्तालयातून त्यांच्या पोलीस ठाण्याचा कार्यभार सोपविण्यात आला. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त पोळांनी त्यावेळी काय साधले, हे अजूनही प्रामाणिक पोलिसाला समजलेले नाही. नवी मुंबइचे पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी नवी मुंबई पोलीस दलाचा कार्यभार स्वीकारला आहे. पोलीस दलातील भ्रष्ट कलेक्टर संस्कृती आयुक्त प्रसाद मोडून काढतील का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader