‘निवडून येण्याची क्षमता’ या एकाच निकषावर राजकीय पक्ष प्रामुख्याने आपल्या उमेदवाराची निवड करत असल्याने आणि प्रचारातही मतांची अधिकाधिक बेगमी करण्यावर प्रत्येक उमेदवार प्राधान्य देत असल्याने देशाच्या सर्वोच्च सभागृहात विराजमान होण्याची मनिषा बाळगणारे नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवार तसेच पदाधिकारी परराष्ट्र धोरण, अर्थकारण यांसारख्या महत्वपूर्ण विषयांत आपला वकूब दाखवू शकले नसल्याचे येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नामदार गोपाळकृष्ण गोखले जनसंज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागाच्यावतीने आयोजित ‘राजकीय जनजागृती’ कार्यक्रमात समोर आले. सलग सहा दिवस चाललेल्या या उपक्रमात राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी विकास कामे, पाणी, भ्रष्टाचारास विरोध, निवडणुकीला दिला जाणारा जातीय रंग, खासगीकरणाच्या विरोधात भूमिका असे वेगवेगळे मुद्दे मांडून भूमिका स्पष्ट केली. परंतु, लोकसभा सभागृहातील कामकाजाशी सुसंगत मुद्यांवर मात्र कोणी फारसे मत प्रदर्शन केले नाही.
एचपीटी महाविद्यालयाच्या जनसंज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या समारोप सत्रात १६ व्या लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरलेल्या उमेदवारांनी मांडलेल्या मुद्यांवर कारणमीमांसा करताना ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी देखील ही बाब अधोरेखीत केली. नेहमीच्या निवडणुकीपेक्षा लोकसभेची ही निवडणूक सर्वार्थाने वेगळी आहे. देशाच्या लोकशाहीचा प्रवास पुढे कोणत्या मार्गाने होणार हे या निवडणुकीतून स्पष्ट होईल. जनजागृती कार्यक्रमाचा श्रीगणेशा महायुतीच्या नेत्यांनी केला. मनसे व भाजपच्या नव्या मैत्री अध्यायामुळे निर्माण झालेल्या ताण-तणावाची छाया स्थानिक पदाधिकाऱ्यांवर पडल्याचे किमान या ठिकाणी दिसले नाही. भाजप पदाधिकाऱ्यांनी नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये राबविलेल्या संकल्पनांकडे लक्ष वेधून प्रभावीपणे केलेल्या कामांची माहिती दिली. तर, जातीपातीच्या राजकारणासाठी शिवसेनेने राष्ट्रवादीला जबाबदार ठरविले. भाजप उमेदवाराने १०० टक्के मतदानाचा आग्रह धरला. माकपचे उमेदवार व पदाधिकाऱ्यांनी सुस्पष्ट विवेचन करत अनेक विषयांना स्पर्श केला. महागाई कशी कमी करता येईल याचा आराखडा, खासगीकरणास विरोध, पाण्यावरून चाललेले राजकारण यावर भाष्य करत अन्न प्रक्रिया उद्योगाची आवश्यकता असे प्रगतीशील विचारही मांडले.
सतत बातमीत राहणारा पक्ष म्हणजे आम आदमी. या पक्षाच्या उमेदवाराचा रोख साहजिकच भ्रष्टाचाराविरोधातील लढाईवर केंद्रीत राहिला. भ्रष्टाचारास विरोध, व्यवस्था बदलविण्याचा आग्रह आणि स्वराज्य कायदा यासाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या आपने भ्रष्टाचाराच्या धुंडाळलेल्या प्रचंड अशा आकडेवारीचा लेखाजोखा सादर केला. नेहमीच आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसेने कार्यक्रमाद्वारे आपला सुसंस्कृत चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न केला. शुध्द पाणी पुरवठय़ाची गरज व त्यासाठीची योजना, नाशिकला ‘वायफाय सिटी’ करण्याचा प्रयत्न अशा भविष्यकालीन योजना मनसे उमेदवाराने मांडल्या. काँग्रेस आघाडीने आजवर केलेल्या विकास कामांची भलीमोठी यादी सादर केली. विकासाच्या मुद्यावर काँग्रेस आघाडी निवडणुकीला सामोरे जाणार आहे. नाशिक शहर गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी पुढाकार घेण्याची ग्वाही राष्ट्रवादीकडून देण्यात आली. बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विरोध हा एककलमी कार्यक्रम ठेवला. तर, भारिप बहुजन महासंघाने आपल्या उमेदवारीचे कारण स्पष्ट केले.
या कार्यक्रमात बहुतेक राजकीय पक्ष व उमेदवारांनी स्थानिक मुद्यांना सर्वाधिक प्राधान्य दिल्याचे लक्षात आले. लोकसभेत जाऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराच्या बोलण्यातून त्याचा अभ्यास अधोरेखीत होणे गरजेचे आहे. भारताने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारून दोन दशकांहून अधिक काळ लोटला आहे. या कालावधीत देशाला आर्थिक मंदीचे चटकेही सहन करावा लागले. बदलत्या आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढण्याची जबाबदारी १६ व्या लोकसभेवर आहे. राजकीय पक्ष तो प्रयत्न कसा करणार, हा महत्वपूर्ण मुद्दा असल्याचे भटेवरा यांनी नमूद केले. कार्यक्रमात परराष्ट्र धोरणावर कोणतेही व्यक्तव्य करण्यात आले नाही. देशात बेरोजगारी वाढत असताना दुसरीकडे कृषी उत्पादनात लक्षणीय कामगिरीची नोंद झाली. देशातील गरिबांच्या संख्येतील अस्पष्टता, अर्धवट अवस्थेत रेंगाळणारी ‘आधार’ योजना, खासगीकरणाचे खुद्द शासनाकडून होणारे समर्थन याकडे त्यांनी लक्ष वेधले. लोकशाहीचा प्रवास सकारात्मक दिशेने वळविण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांकडून होणे आवश्यक असल्याचेही भटेवरा यांनी मांडले.
‘राजकीय जनजागृती’ उपक्रमातील निष्कर्ष
‘निवडून येण्याची क्षमता’ या एकाच निकषावर राजकीय पक्ष प्रामुख्याने आपल्या उमेदवाराची निवड करत असल्याने आणि प्रचारातही मतांची अधिकाधिक बेगमी
आणखी वाचा
First published on: 18-03-2014 at 01:58 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political awareness program organised by education society