कल्याण डोंबिवली महापालिकेने डोंबिवलीतील महत्वाचे रस्ते तसेच चौकांमध्ये फलक लावण्याचा ठेका एस. एस. ईलेक्टिल कंपनीला दिला आहे. या ठेकेदाराची मुदत मंगळवारी संपत आहे. त्यामुळे ठेकेदाराकडून निवडणूक विषयक राजकीय फलक लावण्याची नोंदणी करून घेण्यात येत नसल्याने राजकीय नेते संताप व्यक्त करीत आहेत. महापालिका प्रशासन ठेका वाढवून घेण्याविषयी निर्णय घेत नसल्याने एकूणच संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
डोंबिवलीत पन्नासहून अधिक महत्वाच्या ठिकाणी ठेकेदाराचे फलक लावण्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. महापालिकेची परवानगी घेऊन ठेकेदाराच्या माध्यमातून याठिकाणी जाहीरात फलक लावण्यात येतात.
निवडणूक आचारसंहिता काळात राजकीय फलक लावण्याविषयी आयोगाचे कडक आदेश आहेत. मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी कल्याण डोंबिवलीत गल्लीबोळात फलक लावले. निवडणूक निरीक्षकांनी त्याची गंभीर दखल घेतली आणि तत्कालिन आयुक्त शंकर भिसे यांची तडकाफडकी बदली केली. यामुळे यंदाच्या निवडणुकीत महापालिका अधिकारी डोंबिवलीत बोकाळलेल्या राजकीय फलकबाजीला आवर घालण्याचा प्रयत्न करत आहेत. महापालिकेचा नोंदणीकृत ठेकेदार असलेल्या एस. एस. ईलेक्ट्रिल या कंपनीच्या ठेक्याची मुदत मंगळवारी संपत आहे. त्यामुळे संबंधीत ठेकेदार राजकीय नेते तसेच उमेदवारांच्या फलकांची नोंदणी करून घेण्यास नकार देत आहे. त्यामुळे ठेकेदार आणि नेते यांच्यात खडाजंगी सुरु असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
महापालिका प्रशासन ठेक्याची मुदत वाढवून देते की नाही याची वाट ठेकेदार पाहत आहे. ऐन निवडणुकीच्या काळात ही परिस्थिती निर्माण झाल्याने राजकीय नेते महापालिकेच्या नावाने खडे फोडताना दिसत आहेत. आमच्या ठेक्याची मुदत मंगळवारी (३० सप्टेंबर) संपत आहे. तत्पूर्वी फलक लावण्यास नेते मंडळींना परवानगी दिली तर पुन्हा आमच्यावर कारवाई होईल. महापालिकेने आम्हाला ठेका वाढवून दिला तर नेत्यांच्या मागणीचा विचार केला जाईल, असे एस. एस. ईलेक्ट्रिकल कंपनीच्या संचालकाने सांगितले. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी अनधिकृत फलकबाजी करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई करण्याची तंबी दिल्याने नेत्यांमधील धास्ती आणखी वाढली आहे.
दरम्यान, महापालिकेच्या मालमत्ता विभागाचे साहय्यक आयुक्त प्रकाश ढोले यांच्याशी सतत संपर्क करूनही ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत. त्यांच्या कार्यालयातून ते बैठकीसाठी गेले असल्याचे सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Oct 2014 रोजी प्रकाशित
डोंबिवलीत राजकीय फलकबाजीला ठेकेदाराचा अडथळा
कल्याण डोंबिवली महापालिकेने डोंबिवलीतील महत्वाचे रस्ते तसेच चौकांमध्ये फलक लावण्याचा ठेका एस. एस. ईलेक्टिल कंपनीला दिला आहे. या ठेकेदाराची मुदत मंगळवारी संपत आहे. त्यामुळे ठेकेदाराकडून निवडणूक विषयक राजकीय फलक लावण्याची नोंदणी करून घेण्यात येत नसल्याने राजकीय नेते संताप व्यक्त करीत आहेत.

First published on: 01-10-2014 at 06:55 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political banner in dombivli