राजकीय पक्षांची उमेदवारी किंवा कुठलेही पद न मिळालेल्या कार्यकर्त्यांंचा आम आदमी या नव्याने स्थापन झालेल्या जिल्हा कार्यकारिणीत समावेश करण्यात आल्याची माहिती समोर आली असून या कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  
आगामी २०१४ सालच्या लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका समोर ठेवून अरविंद केजरीवाल यांनी ‘आम आदमी’ या नव्या राजकीय पक्षांची स्थापना केल्यानंतर पक्षाचे काही प्रमुख कार्यकर्ते पक्षसंघटन वाढविण्यासाठी जिल्ह्य़ात आणि तालुका पातळीवर मेळावे आयोजित करून प्रचार करीत आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मयंक गांधी यांच्याकडे महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मयंक गांधी यांनी नुकताच नागपुरात मेळावा आयोजित केला होता. यात वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी न मिळालेले किंवा पक्षाच्या कार्यकारिणीत कुठलेही स्थान न मिळालेले अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यातील काही कार्यकर्त्यांनी कबुली देऊन आता केवळ ‘आम आदमी’साठी काम करण्याचा निश्चय केला आहे.
 एकेकाळी काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले आणि नंतर स्वतंत्र विदर्भ आंदोलनात सहभागी झालेले विदर्भ राज्य पक्षाचे पदाधिकारी डॉ. गोविंद वर्मा, माजी आमदार श्रावण पराते यांचे चिरंजीव प्रणय पराते यांच्यासह अनेक कार्यकर्ते विदर्भ राज्य पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना या पक्षाशी संबंधित आहेत. तर काही कार्यकर्ते हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबधित असल्याची माहिती समोर आली आहे. मयंक गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात येणार नसल्याचे मेळाव्यात जाहीर करताच दहा ते बारा स्वयंसेवक बाहेर पडले आणि पुन्हा सभागृहाकडे फिरकलेदेखील नाहीत. याशिवाय महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले अनेक कार्यकर्ते मेळाव्यात सहभागी झाले होते. जिल्हा कार्यकारिणीत जे सदस्य राहतील त्यांना कुठलीही निवडणूक लढता येणार नाही किंवा पक्षात कुठलेही स्थान मिळणार नाही असे मयंक गांधी यांनी मेळाव्याप्रसंगी जाहीर केल्यावर काही कार्यकर्त्यांनी जिल्हा कार्यकारिणीत नाव न देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा कार्यकारिणीसाठी ज्या २५ लोकांची यादी जाहीर करण्यात आली आहे त्यातील काही कार्यकर्ते वेगवेगळ्या राजकीय पक्षाशी संबंधीत असल्याचे बोलले जात आहे. भ्रष्टाचार मुक्त आणि व्यवस्था परिवर्तनासाठी लढणाऱ्या   आम आदमी या नव्या राजकीय पक्षाचे नियम आणि ध्येय बघता विविध राजकीय पक्षाचे धरसोड वृत्तीचे कार्यकर्ते टिकतील असा प्रश्न इंडिया अंगेस्ट करप्शनच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.