लोकसभा निवडणुकीसाठी तारखा घोषित झाल्या असून विदर्भातील विविध लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रणधुमाळीला लवकरच रंगत येणार आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा असताना लोकसभा निवडणुकीच्यानिमित्ताने गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापत आहे. निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय मोर्चेबांधणीला उद्या, गुरुवारपासून वेग येणार आहे. येत्या काही दिवसात विदर्भातील उन्हाळा बघता एप्रिलमध्ये विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी घाम गाळावा लागणार आहे. विदर्भातील विविध जिल्ह्य़ात उमेदवारांबाबत राजकीय चित्र अजूनही स्पष्ट झाले नसले तरी काही जिल्ह्य़ात उमेदवारी मिळेल या आशेने प्रचार सुरू केला आहे.
सोळाव्या लोकसभेसाठी विदर्भातील १० लोकसभा मतदार संघात येत्या १० एप्रिलला मतदान होणार आहे. या निवडणुकीत दोन कोटीच्या जवळपास मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संघाच्या पुनर्रचनेत विदर्भातील एक लोकसभा मतदार संघ गेल्यावर्षी कमी झाला. आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांची शासकीय वाहने परत घेण्यात येत आहेत. महापौर अनिल सोले, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गोतमारे यांच्यासह अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, अर्थराज्यमंत्री राजेंद्र मुळक, रोहयोमंत्री नितीन राऊत यांनी आपली सरकारी वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात परत केली आहे. शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या राजकीय पोस्टर आणि हॉर्डिग हटविण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत.
मतदार संघाच्या पुनर्रचनेपूर्वी विदर्भात लोकसभेचे ११ मतदार संघ होते. त्यात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, चिमूर, अकोला, बुलढाणा, वाशीम, वर्धा, रामटेक आणि यवतमाळ मतदारसंघांचा समावेश होता. पुनर्रचनेनंतर लोकसभेचा एक आणि विधानसभेचे चार मतदार संघ कमी झाले आहेत. विदर्भातील उमरखेड व मलकापूर या दोन विधानसभा मतदारसंघाचा अनुक्रमे हिंगोली आणि रावेर लोकसभा मतदार संघात समावेश झाला आहे. नागपूर शहरात दक्षिण पश्चिम या मतदार संघाची भर पडली. यवतमाळ लोकसभा मतदार संघ संपुष्टात येऊन यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघ तयार झाला असून या मतदार संघातून शिवसेनेच्या भावना गवळी दोनदी विजयी झाल्या आहेत. चिमूर ऐवजी गडचिरोली – चिमूर हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. भंडारा ऐवजी भंडारा-गोंदिया हा मतदारसंघ आहे. विदर्भातील दहाही मतदार संघात उद्या गुरुवारपासून खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या तयारीला प्रारंभ होणार आहे. विविध राजकीय पक्षांची निवडणुकीच्या दृष्टीने जनसंपर्क कार्यालये स्थापन झाली असून त्यांनी शहरात संपर्क केला आहे. मतदार याद्या अंतिम झाल्या नसल्या तरी त्याला येत्या काही दिवसात अंतिम रूप देण्यात येईल. ९ मार्चपर्यंत नावे नोंदविण्यात येणार असल्यामुळे त्यानंतर मतदार यादीला अंतिम रूप देण्यात येईल.  लोकसभा निवडणुकांची चाहूल लागताच राज्य सरकारने विविध योजना मंजूर करून काही योजनांचे भूमिपूजन केले. शहरातील विविध प्रभागांमध्ये रस्त्यांची कामे असो की समाजभवनाचे उद्घाटन असो, हे कार्यक्रम मंगळवार सायंकाळपर्यंत आटोपते घेतले. आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका आणि महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी शासकीय वाहने परत करण्यास सुरुवात केली आहे. शहरात लावण्यात आलेले राजकीय पोस्टर आणि होर्डिग काढण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा