आमदार आणि खासदार होण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांमध्ये अकोल्यात चुरस दिसते, पण याच ज्येष्ठ नेत्यांच्या राजकारणात त्यांच्या मुलांचे व कार्यकर्त्यांचे राजकारण अगदी रसातळाला जात असल्याचे चित्र जिल्ह्य़ात आहे. सर्वच पक्षात ज्येष्ठांच्या अपेक्षा अद्याप अपूर्ण असल्याने ते आता त्यांच्या मुलांच्या राजकारणात अडथळा ठरत आहेत. स्वतचा दावा सोडून जिल्ह्य़ातील ज्येष्ठ राजकारणी त्यांच्या पोरांसाठी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी केव्हा पुढाकार घेतील, असा प्रश्न उपस्थित होतो.
जिल्ह्य़ात काँग्रेसमध्ये सर्वाधिक ज्येष्ठ नेते आहेत. यात अग्रस्थानी काँग्रेस नेते के.ना.पाटील अर्थात बाबासाहेब धाबेकर आहेत. बाबासाहेब धाबेकर यांचे चिरंजीव सुनील धाबेकर जिल्हा परिषदेचे सदस्य आहे, पण जसे बाबासाहेब धाबेकर लोकसभेचे पुन्हा दावेदार असू शकतात तसे सुनील धाबेकर का असू शकत नाही, असा प्रश्न तरुण नेत्यांना पडला आहे. बाबासाहेब धाबेकर अकोला लोकसभा मतदार संघाचे उमेदवार राहू शकतात, त्याचबरोबर कारंजा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार राहण्याची शक्यता काँग्रेस गोटातून व्यक्त होत आहे. त्याच वेळी मुलगा सुनील धाबेकर किंवा जावई बाबाराव विखे पाटील यांच्या दावेदारीबद्दल साधी चर्चाही पक्षात होत नाही. अशीच परिस्थिती इतर राजकीय नेत्यांबद्दल कायम आहे. बाळापूरचे काँग्रेस नेते लक्ष्मणराव तायडे खासदार पदासाठी इच्छूक आहे, पण त्यांचा मुलगा प्रकाश तायडे यांच्याबद्दल कोणी दावेदारी करताना दिसत नाही. बाळापूरच्या विधानसभेच्या जागेसाठीही त्याचा विचार का केला जात नाही, असा प्रश्न उपस्थित होतो, पण याबाबत बाळापूरचे नतीकोद्दीन खतीब हे अपवाद ठरू शकतात. त्यांचा मुलगा ऐनोद्दीन खतीब यास वडिलांनी पुरेपूर संधी दिल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात.
अकोल्यातील काँग्रेस नेते अजहर हुसेन यांचा मुलगा डॉ. झिशान हुसेन यांच्या दावेदारीबद्दल काँग्रेसमध्ये चर्चा रंगत नाही. अकोटचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधाकर गणगणे यांचे चिरंजीव महेश गणगणे हे अजूनही एनएसयुआयमध्येच व्यस्त आहेत. त्यांचा सक्रीय राजकारणात वा अकोटचे विधानसभेचे उमेदवार दावेदार म्हणून पाहिले जात नाही. याबाबत रामदास बोडखे अपवाद ठरतात. काँग्रेस नेते अनंतराव देशमुख लोकसभेचे दावेदार आहेत, पण त्यांचा मुलगा नकुल देशमुख यांच्या दावेदारीबद्दल कोणीही पुढाकार घेत नाही. सुभाष झनक यांचा मुलगा अमित झनक यांच्याबद्दलही तशीच स्थिती कायम आहे. शिवसेना नेते गुलाबराव गावंडे विधानसभेचे दावेदार ठरू शकतात, पण मुलगा संग्राम गावंडे यांच्या दावेदारीवर चर्चा होत नाही. भाजपचे गोवर्धन शर्मा यांनी पक्षात तरुणांचे राजकारण संपविल्याची ओरड खाजगीत होते. त्यांची मुले राजकारणात सक्रीय नसल्याने पक्षातील तरुणांना कधी संधी मिळेल, असा प्रश्न कायम आहे. भाऊसाहेब फुंडकर यांच्या राजकारणाने आकाश फुंडकर, नारायण गव्हाणकर यांचा मुलगा मुकेश गव्हाणकर यांचा मार्ग केव्हा प्रशस्त होईल, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. ज्येष्ठांच्या राजकारणाने तरुणांना बसणारा फटका हा तरुणांच्या कर्तृत्वाबरोबर कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करतो. ज्येष्ठ राजकीय नेते त्यांच्या मुलांना राजकारणात पुढे करत नाही त्याचबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांनाही न्याय देत नसल्याचे चित्र येथे आहे. भारत हा तरुणांचा देश आहे, पण येथील राजकीय नेतृत्व हे वयाने ज्येष्ठ असलेल्यांकडे आहे. तरुणांनी नव्या उमेदीने राजकारणात काम करावे, तरुणांनी सक्रिय राजकारणात यावे, असे ज्येष्ठ नेते भाषणात लाख वेळा म्हणतात, पण ते कृतीत कमी पडतात. स्वतच्या मुलांसाठी वा कार्यकर्त्यांसाठी ज्येष्ठांनी एक पाऊल मागे येण्याची गरज राजकारणात आता व्यक्त केली जात आहे. इतर पक्षातील ज्येष्ठांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या उत्कर्षांसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा