शनिवारी-रविवारी टी-शर्टचे वाटप
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बहुसंख्य गोविंदा पथकांनी आपल्या विभागातच दहीहंडय़ा फोडण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी विभागात जाहिरातबाजी होणार असल्याने राजकीय नेतेही खुश झाले आहेत. स्वाभाविकच निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी गोविंदांसाठी थैल्या मोकळ्या सोडल्या आहेत. न्यायालयाच्या दणक्यानंतरही पुरस्कर्त्यांनी मदतीची रसद कायम ठेवल्यामुळे गोविंदा पथके सुखावली आहेत.
न्यायालयाच्या निर्णयानंतर गोविंदा पथके संभ्रमित झाली असली तरी अनेक नेत्यांनी गोविंदांसाठी टी-शर्ट बनवायला टाकले आहेत. शनिवार- रविवारी या टी-शर्टचे वाटप होईल, असे राजकीय नेत्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. ‘आयोजकां’नी काढता पाय घेतला असला तरी ‘मदतकर्त्यां’नी सढळ मदत करण्याचा निर्णय घेतल्याने गोविंदा पथकांना मोठाच आधार मिळाला आहे.
एकाच रंगाचे आकर्षक टी-शर्ट ही प्रत्येक गोविंदा पथकाची ओळख असते. सात आणि त्यापेक्षा अधिक उंचीची दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांचा टी-शर्टवर बराच खर्च होतो. आधीच्या वर्षी कमविलेले पैसे टी-शर्टवर खर्च केले जातात. विभागातील काही नेते अथवा पथकाचे हितचिंतकही टी-शर्टसाठी मदतीचा हात पुढे करतात. परंतु मोठय़ा पथकांतील गोविंदांच्या टी-शर्टवर नेत्यांची जाहिरातबाजी प्रकर्षांने टाळली जाते. त्यामुळे मोठय़ा पथकांना टी-शर्ट देण्याच्या फंदात सहसा राजकीय नेते पडत नाहीत. त्यामुळेच मग परिसरातील छोटी गोविंदा पथके स्थानिक नेत्यांसाठी महत्त्वाची ठरतात. विभागातच फिरणाऱ्या छोटय़ा गोविंदा पथकांना टी-शर्ट दिल्यानंतर नेत्याची छबी दिवसभर विभागातील नागरिकांच्या डोळ्यासमोर राहते आणि चांगली प्रसिद्धी होते हा त्यामागचा उद्देश असतो.

दहीहंडी हा आनंदाचा, जल्लोषाचा उत्सव आहे. मात्र काही आयोजकांनी या उत्सवाला धोकादायक बनविले आहे. थरांची चढाओढ आणि त्यातून होणारे अपघात यामुळे मुलांचे जीव धोक्यात आले आहेत. उत्सावाचे व्यापारीकरण थांबवायलाच हवे होते. गोविंदांनी कमी उंचीच्या दहीहंडय़ा फोडून उत्सवाचा आनंद लुटावा. गोविंदांना मदत म्हणून दरवर्षीच आम्ही टी-शर्ट देतो. यंदाही देणार आहोत.    
              -राज के. पुरोहित, भाजप नेते

दरवर्षी विभागातील गोविंदांना मदत म्हणून टी-शर्ट दिले जातात. न्यायालयाच्या आदेशाचा त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकांना यंदाही टी-शर्ट देण्यात येणार आहेत. त्यात खंड पडणार नाही.    
                     -भाई जगताप, काँग्रेस नेते

दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळातर्फेच टी-शर्ट, जेवण आणि नाश्त्याचा खर्च करण्यात येणार आहे. यासाठी दरवर्षी स्पॉन्सर मिळतातच असे नाही. मात्र दरवर्षी दहीहंडी फोडून जमा होणाऱ्या पैशांतून हा खर्च केला जातो. तसा तो यंदाही करण्यात येत आहे.    
    -राजा सावंत,                            
    हौशी बाल मित्र मंडळ, झावबावाडी

प्रत्येक ठिकाणी दहीहंडी फोडल्यानंतर आमच्या पथकाकडून आयोजकांना पावती दिली जाते. हे सर्व पैसे बँकेतील मंडळाच्या खात्यावर जमा होतात. त्यातूनच पुढील वर्षी दहीहंडी उत्सवाचा सर्व खर्च पथक करीत असते. त्यात गोविंदांचा नाश्ता, जेवण, टी-शर्ट, बस आदी खर्च केला जातो. राजकीय नेत्यांकडून एखाद्या वर्षी मदत मिळते. पण ती थोडीच असते.    
    -अरुण पाटील प्रशिक्षक,
    अखिल दक्षिण मुंबई सार्वजनिक     गणेशोत्सव मंडळ माझगाव ताडवाडी

Story img Loader