ठाणे महापालिकेचा पांढरा हत्ती म्हणून ओळखले जाणारे दादोजी कोंडदेव स्टेडियम पुन्हा एकदा राजकीय नेते, त्यांच्याशी संबंधित संस्था आणि या संस्थांच्या सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांसाठी खुले करण्याचा निर्णय विद्यमान आयुक्त असीम गुप्ता यांनी घेतला आहे. अशा कार्यक्रमांचे आयोजन करताना या मैदानाची तेथील स्टेडियमची आणि सोयी-सुविधांची दुरवस्था होत असल्याचे लक्षात येताच तत्कालीन आयुक्त आर.ए.राजीव यांनी अशा स्वरूपाच्या सर्वच कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. खेळाचे मैदान क्रीडापटूंसाठी मोकळे राहायला हवे, असा राजीव यांचा आग्रह होता. राजीव यांची बदली होताच महापालिका प्रशासनाची राजकीय नेत्यांवरील ‘असीम’ माया पुन्हा एकदा उफाळून आली असून विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांच्या ‘वसंत बाल महोत्सवासाठी’ हे मैदान तीन दिवस भाडय़ाने देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. प्रशासनाच्या या नव्या प्रस्तावामुळे हे मैदान सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भाडेपट्टय़ाने घेण्याचा मार्ग मोकळा झाल्याने ठाण्यातील सर्वच राजकीय नेत्यांच्या मनात उत्साहाचा ‘वसंत’ बहरला असून या प्रस्तावाला आवाजी मतदानाने मंजुरी देण्यासाठी महापालिका वर्तुळात सर्वपक्षीय मोर्चेबांधणी केली जात आहे.
दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये कार्यक्रमांसाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपामुळे मैदानाची दुरवस्था होत असल्याने राजीव यांनी हा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे वर्षोनुर्वष प्रेक्षागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘शायनिंग’ करणाऱ्या राजकीय पक्षातील बडय़ा नेत्यांना फटका बसला होता. दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मैदानात खड्डे खोदून त्या ठिकाणी भलेमोठे व्यासपीठ उभारले जायचे. खड्डे खोदाईमुळे मैदानाची दुरवस्था होत असल्याने क्रीडापटूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे क्रीडापटूंना सरावही करता येत नव्हता. त्याविषयी खेळाडूंमध्ये नाराजी होती. विशेष म्हणजे, प्रेक्षागृहात सर्वच राजकीय पक्षांचे कार्यक्रम होत असल्याने त्याविषयी एकही पक्षातील नेता ‘ब्र’ काढताना दिसत नव्हता. याविषयी क्रीडाप्रेमींमध्ये तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्याने दोन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त राजीव यांनी प्रेक्षागृहात सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घातली होती. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पडद्याआडून राजकीय नेत्यांचे मेळावे या मैदानांमध्ये होत असत. राजीव यांना हे उमगले आणि त्यांनी मैदानात केवळ खेळ सुरू राहतील, अशी भूमिका घेतली.
राजीव यांची बदली होताच नवे आयुक्त असीम गुप्ता यांनी मात्र यासंबंधी मवाळ भूमिका घेतली असून आमदार निरंजन डावखरे यांच्या समन्वय प्रतिष्ठान या संस्थेने आयोजित केलेल्या ‘वसंत बाल महोत्सवा’साठी येत्या २२ ते २४ नोव्हेंबर रोजी हे मैदान भाडेपट्टय़ावर देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. लहान मुलांच्या शालेय क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच राष्ट्रीय एकात्मावर आधारित ‘एक सूर एक ताल’ या कार्यक्रमावर विद्यार्थी खेळाचे प्रात्यक्षित सादर करणार आहेत. तसेच लहान मुलांसाठी फॅशन शो आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रेक्षागृहाचा पहिला माळ्यावरील वरांडा, व्ही. आय.पी. सभागृह, मैदान उपलब्ध करून देण्यासंबंधीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. यासंबंधी महापालिकेचे उपायुक्त तसेच माहिती व जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता, दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहाच्या वरांडय़ात चित्रकला स्पर्धा होणार आहे. तसेच विद्यार्थी मैदानात केवळ ‘एक सूर एक ताल’ या कार्यक्रमात राष्ट्रगीते सादर करणार आहेत. संस्थेला इतर सांस्कृतिक कार्यक्रमास परवानगी देण्यात येणार नाही. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रेक्षागृहात परवानगी देऊ नये, यासाठी महापालिका आयुक्त असीम गुप्ताही आग्रही आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
दादोजी कोंडदेव प्रेक्षागृह सांस्कृतिक कार्यक्रमांना देऊ नये, यासाठी महापालिका प्रशासन आग्रही आहे. मात्र, ‘वसंत बाल महोत्सव’ हा कार्यक्रम क्रीडा स्पर्धाशी संबंधित असून तो शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे. तसेच मैदानात कोणत्याही प्रकारचे व्यासपीठ उभारण्यात येणार नाही. आमच्यामुळे मैदानाची दुरवस्था होऊ नये, याची पूर्ण काळजी आम्ही घेणार आहोत. लहान मुलांमधील क्रीडा गुणांना वाव मिळावा, यासाठी संस्थेमार्फत हा कार्यक्रम केला जातो. असीम गुप्ता यांनी कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा लक्षात घेऊन यासंबंधी प्रशासनाला प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. मैदान तसेच स्टेडियमच्या कोणत्याही भागाला आमच्यामुळे हानी पोहचणार नाही, यासाठी संस्था डोळ्यात तेल घालून काम करेल, असा दावाही निरंजन यांनी केला.