पुरोगामी विचारवंतांवर हल्ले होत आहेत, कारण तसे वातावरण राज्यात आणि देशात आहे. असे हल्ले प्रारंभी विचारवंतांवर आणि भविष्यात राजकीय नेत्यांवर होतील, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत अ‍ॅड. आंबेडकर यांनी वैचारिक दहशतवादापासून तर देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीवर विचार व्यक्त केले. कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावरील हल्लातून हेच दिसून येते की, आपल्याला विरोध करणाऱ्यांना संपवा ही प्रवृत्ती बळावली आहे. सांगली, कोल्हापूर आणि मिरज ही शहरे काही सनातनी संघटनांची केंद्रे आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यासारख्या संघटनांनीसुद्धा ऐकेकाळी हिंसेचे समर्थन केले होते. आता आम्ही सुधारलो आहोत. हिंसक सनातनी संघटनांशी आमचा संबंध नाही. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणणे आम्ही नाकारत नाही. परंतु त्यांनी निर्माण केलेला हा भस्मासूर त्यांच्याच डोक्यावर   हात ठेवणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ते थांबवण्याचे बळ नाही, असेही ते म्हणाले.
या सनातनी संघटना वैचारिक दहशवाद निर्माण करीत आहेत. आपल्या विचारणसरणीला कोणी विरोधी करीत असेल तर त्याचा मुडदा पाडा, अशी प्रवृत्ती त्यांची आहे. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. त्यांच्याकडे टीकेला उत्तर देण्याची क्षमता नाही. त्यामुळे टीका करणाऱ्यांवर हल्ला करतात. प्रारंभी ते त्यांना विरोध करणाऱ्यांवर हल्ले करतील आणि त्यानंतर राजकीय नेत्यांना लक्ष्य बनवतील, असेही ते म्हणाले.
धार्मिक संघटना, धर्माचा प्रचार आणि धर्मांतर हे लोकशाहीच्या चौकटीत झाले पाहिजे. काही संघटना चौकटीच्या बाहेर आहेत. ते हिंसक मार्गाचा अवलंब करतात. अशा हिंसक संघटना शोधून काढून त्यावर तसा शिक्का मारला गेला पाहिजे. सरकारने एकदा हे केले की, कोणत्या संघटनेशी नरमाई आणि कुणाशी कठोर वागायचे, असा प्रश्न पोलीस यंत्रणेला पडणार नाही. त्यामुळे सरकारला अशा संघटनांवर नियंत्रण आणता येईल. असे न झाल्यास सध्या आम्हाला खायला निघालेला भस्मासूर उद्या तुम्हाला लक्ष्य करेल, असे ते म्हणाले.  
आपल्या विचारला विरोध करणाऱ्यांना संपण्याचे धाडस या देशात होत आहे. कारण देशात आणि राज्यात तसे वातावरण आहे. सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे संदेश असा जातो आहे की, आपल्याला आता अडवणारे कुणी  नाही. आपल्याला हवे ते पटापट ओटोपून टाका, असेही ते म्हणाले. भाजप आणि काँग्रेस पक्षाचे आर्थिक धोरण समान आहे. जनतेला पंतप्रधान मोदींनी दिलेले आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण होताना बघायचे आहे. परंतु नऊ महिन्यांत मोदींची घसरण होत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस पक्ष जोपर्यंत तरुणांशी संवाद साधत नाही तोपर्यंत या पक्षाचे पुनरुज्जीवन होणार नाही. भाजप केवळ काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यात प्रबळ झाल्याचे दिसून येते. दक्षिण भारत आणि ईशान्य राज्यात भाजपला फार स्थान नाही. ही सर्व परिस्थिती बघता देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले.

Story img Loader