राष्ट्रवादी काँग्रेस इतके ‘जहाल’सुद्धा होऊ नका
काँग्रेस आणि राकाँमध्ये विकासकामांच्या श्रेय नामावलीसाठी जोरदार संघर्ष सुरू असून वडिलकीच्या नात्याने काँग्रेस ‘मवाळ’, तर धाकटय़ाच्या नात्याने राष्ट्रवादीने ‘जहाल’ भूमिका घेतली आहे, असे चित्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व राकाँ प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्या यवतमाळ दौऱ्यातून दिसून आले.
जिल्ह्य़ात अतिवृष्टीने हाहाकार माजवला. कळंब, बाभूळगाव आणि राळेगाव हे तीन तालुके ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले. जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा करण्यासाठी मुख्यमंत्री चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली आणि घोषणांचा पाऊस पाडला. मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत राकाँ नेते व अन्न आणि औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक वगळता राकाँचा एकही नेता, पदाधिकारी किंवा कार्यकर्ता नव्हता. आम्हाला कुणालाच निमंत्रण नव्हते. मग हात दाखवून अवलक्षण करून घ्यायचे काय, असा राकाँ नेत्यांचा सवाल आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे आणि दोन पूरग्रस्त गावांना दिलेल्या भेटीमुळे काँग्रेसची ताकद वाढेल, अशी भीती वाटल्याने राकाँने काँग्रेसच्या नहल्यावर दहेला मारण्याचा कार्यक्रम आखला. थेट राकाँ नेते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा महाराष्ट्रातील पहिला ‘जनता दरबार’ त्यांनी यवतमाळात भरवला. जनता दरबार शासकीय विश्रामभवनात भरवण्याऐवजी तो राकाँ आमदार संदीप बाजोरीया यांच्या संपर्क कार्यालयात भरवल्याबद्दल आमदार बाजोरीया यांचे कट्टर विरोधक काँग्रेस आमदार नीलेश पारवेकर यांनी एका वार्ताहर परिषदेत टीका केली.
जनता दरबारला अलोट गर्दी झाली आणि शेकडो नागरिकांच्या शिष्टमंडळांनी लोटालोटी करत दादापर्यंत जाऊन गाऱ्हाणी मांडली. ९० टक्के लोकांची गाऱ्हाणी, तक्रारी सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत अविश्रांत बसून आपण ऐकल्या आणि स्थानिक पातळीवरचे प्रश्न लगेच सोडवले. राज्य पातळीवरील प्रश्न मुंबईत पोहोचताच सोडवण्याची पराकाष्ठा करू,असे दादांनी वार्ताहर परिषदेत सांगून घोषणांचा पाऊस पाडला आणि बाजी मारली. उल्लेखनीय म्हणजे, ‘दादां’च्या आढावा बैठकीला काँग्रेसचा एकही नेता किंवा कार्यकर्ता हजर नव्हता. आम्हाला निमंत्रणच नव्हते, मग काय अपमान करून घ्यायला जायचे काय, असा प्रश्न काँग्रेस आमदार नीलेश पारवेकर यांनी विचारला आहे.
आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ज्या घोषणांचा पाऊस पाडला तोच दादांनी सुद्धा पाडला, पण घोषणांची मांडणी अशी चातुर्याने केली की, या सर्व योजना आपणच अमलात आणणार आहोत, असे दर्शवले.
जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या कायापालटासाठी वीस कोटी रुपये, नाटय़गृहासाठी चार पाच कोटी रुपये, परभणी कृषी विद्यापीठाला वसंतराव नाईकांचे नाव, पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन, संरक्षक भिंतींची कामे, त्यासाठी लागणारी अनुदाने सर्व काही आपण देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. अजितदादांच्या दौऱ्यामुळे व जनता दरबारामुळे काँग्रेसमध्ये एवढी अस्वस्थता पसरली की, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी यवतमाळात दोन दिवस तळ ठोकून जिल्ह्य़ातील विकास योजना केवळ ‘राष्ट्रवादी’नेच आणल्या आहेत, हा जनतेचा समज ‘गैर’ आहे, राज्यात आघाडी सरकार आहे, संयुक्त जबाबदारीचे तत्त्व आहे. काँग्रेसचेच निर्णय दादांनी जाहीर केले. हे काँग्रेसच्या मंत्र्यांनी जनतेला सांगावे म्हणून मार्गदर्शन केले. ठाकरे यांनी वार्ताहर परिषदेत सांगितले की, घोषणा व निर्णय जाहीर करण्याचा हक्क ‘सी.एम.’ प्रमाणे ‘डेप्युटी सी.एम.’ यांना जरूर आहे, पण सारे श्रेय त्यांनी एकटय़ाने घेऊ नये.
जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीसाठी २० कोटी मंजूर करण्याचा प्रस्ताव काँग्रेसच्या महसूल मंत्र्यांचा आहे. नाटय़गृहासाठी ४-५ कोटी देण्याचा सांस्कृतिक मंत्रालयाचा प्रस्ताव आहे. परभणी विद्यापीठाला वसंतराव नाईकांचे नाव देण्याचा निर्णय काँग्रेसच्या कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा प्रस्ताव आहे, पण दादांनी या गोष्टींचे श्रेय स्वत:कडे घेतले, अशी प्रदेशाध्यक्षांची खंत आहे. काँग्रेसचे नेते, मंत्री ‘मवाळ’ आहेत. त्यांनी धडाकून आपल्या निर्णयाची घोषणा केली पाहिजे आणि काँग्रेसची कामगिरी सर्व निवडणुकांमध्ये ‘नंबर वन’ राहिली आहे, हे जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजे. ‘मिशन २०१४’ चे लक्ष्य साध्य करायचे असेल तर ‘मवाळ’पणा सोडा, अर्थात ‘तितके’ जहालसुद्धा बनू नका, असे ठाकरे यांनी नेत्यांना सुचवल्याचे समजते.