शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर या पक्षात दाखल झालेले कमलकिशोर कदम व सूर्यकांता पाटील हे नेते स्थानिक पातळीवरील काँग्रेसच्या दाट प्रभावापुढे राजकीयदृष्टय़ा हतबल झाले असल्याचा, तसेच खचून गेल्याचा संदेश गुरुवारी सायंकाळी त्यांनी केलेल्या भाषणांतून नांदेडवासीयांसमोर गेला.
नांदेड-वाघाळा मनपा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीने पक्षाचे ‘डायनामिक’ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत शहराच्या मध्यवर्ती भागात जाहीर सभेचे आयोजन केले होते. ही सभा एकीकडे सुरू असताना शहराच्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शहरातील बुद्धिवंतांशी सुसंवाद साधत होते. अजितदादांच्या सभेला पक्षाचे नगरसेवक, काही उमेदवार आदींनी आपापल्या प्रभागांतून आणलेले समर्थक, कार्यकर्ते अशा दुय्यमांची गर्दी होती. त्यांना नेत्यांच्या भाषणात ‘रस’ नव्हताच. पण ते शेवटपर्यंत बसून होते.
या पाश्र्वभूमीवर श्रीमती पाटील अत्यंत पोटतिडकीने बोलल्या. स्थानिक राजकारणात काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी निर्माण केलेले वर्चस्व, शहरावरील त्यांची पकड हे सर्व संदर्भ श्रीमती पाटील यांच्या भाषणातून आले. अशा स्थितीत आम्ही लढायचे कसे व कोणासाठी, असा सवाल करतानाच चौथा स्तंभही विकला गेल्याचा आरोप त्यांनी केला. त्या म्हणाल्या की, गेल्या ४० वर्षांच्या सार्वजनिक राजकारणात अशा प्रकारची बेबंदशाही आपण बघितली नाही. आम्ही शंकरराव चव्हाण यांच्यासमवेत काम केले, पण त्यांना जे जमले नाही ते त्यांच्या चिरंजीवांनी करून दाखवले. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. शरद पवारांच्या संस्कारातून आम्ही घडलो, पण नांदेडात मात्र पैशांची शक्ती वैचारिक शक्तीवर मात करीत आहे.
गेल्या १५ वर्षांपासून सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी शहरात काय दिवे लावले, रातोरात आराखडे बदलणे, बेबंद झालेला घोडा गोरगरिबांची घरे उद्ध्वस्त करतो त्याप्रमाणे वागणे हे किती दिवस चालणार, असा सवाल त्यांनी केला. आपल्या पक्षाचे जास्त आमदार असतानाही मुख्यमंत्रिपदावर काँग्रेसला संधी देणे ही आपली पहिली चूक झाली, असे सांगताना श्रीमती पाटील यांनी राज्य व केंद्र सरकार राष्ट्रवादीच्या जिवावर चालत असतानाही जिल्ह्य़ात मात्र अन्यायाची परंपरा चालूच आहे. आमच्याच घरात आम्ही बेवारस झालो काय, अशी स्थिती आहे. गुरू-ता-गद्दी निधीत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करा, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला. श्रीमती पाटील यांच्या भाषणाने उपस्थितांपैकी अनेकांना प्रभावित केले खरे, पण त्यांच्या संपूर्ण भाषणात एकदाही टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. माजी मंत्री कदम यांनीही काँग्रेस नेत्यांना आव्हान देत त्यांच्या शिक्षण संस्थेला मिळालेली जागा परत देण्याची तयारी दर्शविली. ज्या-ज्या संस्थांना महापालिकेने जागा दिल्या त्या सर्वानी परत कराव्यात. आपणही इमारतीसह जागा महापालिकेस देण्यास तयार आहोत. १६० कि.मी.चा मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे बाराशे कोटींत झाला. पण नांदेडात २ हजार ८०० कोटी खर्च होऊनही विकास झाला नाही. त्या कामांची चौकशी करावी. नांदेडात सुरू असलेल्या उधळपट्टीचा सोक्षमोक्ष लावावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ३० वर्षे झाले, ही वैचारिक लढाई लढत लढत थकलो आहोत. पैशांपुढे आमचे सत्य चालत नाही. आतातरी न्याय द्या, अशी साद त्यांनी अजितदादांना घातली. जे २५ वर्षांत झाले नाही ते आम्ही पाच वर्षांत करू, अशा शब्दांत त्यांनी मतदारांना आश्वासित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा