ठाणे महापालिका क्षेत्रात चार विधानसभा मतदारसंघ असले तरी मोठय़ा प्रचारसभेसाठी सेंट्रल मैदान ही एकमेव जागा शिल्लक आहे. त्यामुळे या चारही मतदारसंघांसाठी संयुक्त सभा घेण्याचे बेत राजकीय पक्षांकडून आखले जात आहेत. त्यामुळे मागणी वाढलेले सेंट्रल मैदान आरक्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे.
ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा आणि कळवा-मुंब्रा या चारही विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढविण्यासाठी सर्वच पक्षांनी अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. प्रचारासाठी कमी दिवस शिल्लक असल्यामुळे उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून प्रचाराचे नियोजन आखण्यास येत आहे. तसेच बडय़ा नेत्यांच्या सभांचेही बेत आखण्यात येत आहेत. मात्र, अनधिकृत बांधकामांमुळे शहरात मैदाने शिल्लक राहिलेली नाहीत. त्यामुळे बडय़ा नेत्यांच्या सभा नेमक्या कुठे घ्यायच्या, असा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांपुढे पडला आहे. त्यामुळे चारही मतदारसंघांसाठी एकच संयुक्त सभा घेण्याचे बेत राजकीय पक्षांकडून आखले जात आहेत. यातूनच सेंट्रल मैदानाचे महत्त्व वाढले आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या पक्षातील बडय़ा नेत्यांच्या सभा होऊ नयेत, यासाठी काही राजकीय पक्ष आपल्या सभेव्यतिरिक्त इतर दिवशीही मैदान आरक्षित करत असल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. मात्र यंदा अजून तरी असा प्रकार समोर आलेला नाही. असे असले तरी, दरवर्षीचा अनुभव लक्षात घेऊन शिवसेना, मनसे आणि बसपाच्या नेत्यांनी निवडणुकीचे बिगूल वाजताच मैदान आरक्षित केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा