विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी ४० ते ५० टक्के युवा मतदारांची नोंदणी झालेली असताना सर्वच राजकीय पक्षांनी युवकांना संधी देण्याची घोषणा केली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांनी जाहीर केलेल्या विदर्भातील उमेदवारांच्या नावांवर नजर टाकल्यास, विदर्भातील बहुतेक मतदारसंघात जुन्याच उमेदवारांवर विश्वास व्यक्त करण्यात आल्याचे स्पष्ट होते.
राजकारणात नवीन नेतृत्व येऊ पाहत असताना विविध राजकीय पक्षांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभत झालेल्या किंवा विजयी झालेल्या जुन्या शिलेदारांना उमेदवारी दिली आहे. लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी मोठय़ा प्रमाणात युवकांनी मतदार यादीत मोठय़ा प्रमाणात नावे नोंदवल्याने या निवडणुकीत युवकांचे मतदान निर्णायक ठरणार आहे. हे जाणूनच राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनीही संकेतस्थळ आणि इतरही अत्याधुनिक माध्यमांच्या माध्यमातून या वर्गापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या पाश्र्वभूमीवर भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा या राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी नवीन तरुण चेहरे अपेक्षित होते. मात्र राजकीय पक्षांनी अनुभव हा निकष महत्त्वाचा मानला असल्याचे विदर्भातील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या यादीवरून स्पष्ट होते. जास्तीत जास्त युवकांनी राजकारणात यावे अशा केवळ विविध राजकीय पक्षांकडून घोषणा केली जात असली तरी प्रत्यक्षात उमेदवारी देताना मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, बसपा आदी पक्षांनी फारसे निकष पाळले नाहीत.
विदर्भातील विविध मतदारसंघात विविध राजकीय पक्षांनी जुन्या शिलेदारांना उमेदवारी दिली असून त्यातील अनेक उमेदवार पन्नाशी पार केलेले आहेत. काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने संजय देवतळे यांना भाजपने जवळ केले आणि त्यांना उमेदवारी दिली आहे.
याशिवाय भाजपने प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, सुधाकरराव देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर पारवे, अतुल देशकर, सुनील देशमुख, सुधीर मुनगंटीवार, नाना श्यामकुळे, अनिल बोंडे, अरुण अडसड, दादाराव केचे, चैनसुख संचेती, मधुकर कुकडे, सेवक वाघाये आदी नेत्यांना तर काँग्रेसने वसंत पुरके, शिवाजीराव मोघे, सतींश चतुर्वेदी, अनिस अहमद, सुनील केदार, वीरेंद्र जगताप, सुबोध मोहिते, गोपालदास अग्रवाल, रावसाहेब शेखावत, डॉ. नितीन राऊत, वामनराव कासावर, मनोहर नाईक, राजेंद्र मुळक, दिलीप सानंदा, सुरेश देशमुख, धर्मरावबाबा आत्राम, शिवेनेनेचे गुलाबराव गावंडे, आशिष जयस्वाल, राष्ट्रवादी काँग्रेसने रमेश बंग, अनिल देशमुख, वसुधा देशमुख, हर्षवर्धन देशमुख, साहेबराव तट्टे आदी ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
यातील अनेक उमेदवारांनी राजकारणातून निवृत्ती स्वीकारून नवीन कार्यकर्त्यांना उमेदवारी देणे अपेक्षित होते. मात्र, सत्तेपासून दूर राहणे शक्य नसल्यामुळे उमेदवारी मिळवून घेतली.
अनेक उमेदवारांना उमेदवारी देताना त्यांचे राजकीय हितसंबंध जपले गेले आहेत. साठी पार केलेले अनेक उमेदवारांना प्रचारासाठी फिरणे शक्य नाही तरीही ते निवडणूक िरगणात आहेत. एकीकडे नवीन नेतृत्व राजकारणात यावे यासाठी विविध राजकीय पक्ष घोषणा करीत असले तरी सत्तेची लालसा असलेल्यांना सत्ता सोडवत नसल्यामुळे नवीन नेतृत्व समोर येते हे तितकेच खरे आहे.
विविध राजकीय पक्षांची जुन्या शिलेदारांवर भिस्त
विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी ४० ते ५० टक्के युवा मतदारांची नोंदणी झालेली असताना सर्वच राजकीय पक्षांनी युवकांना संधी देण्याची घोषणा केली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांनी जाहीर केलेल्या विदर्भातील उमेदवारांच्या नावांवर नजर टाकल्यास, विदर्भातील बहुतेक मतदारसंघात जुन्याच उमेदवारांवर विश्वास व्यक्त करण्यात आल्याचे स्पष्ट होते.
First published on: 08-10-2014 at 08:18 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political parties in vidarbha depend on old party workers