निवडणुका जाहीर होऊन चार दिवसांचा कालावधी लोटला असला तरी स्थानिक पातळीवर मात्र अद्याप निवडणुकीच्या लगबगीला म्हणावी तशी सुरुवात झालेली नाही. विशेष म्हणजे निवडणुका जाहीर होण्यापूर्वी ज्या राजकीय हालचाली सुरू होत्या त्याही आता काही प्रमाणात थंडावल्या आहेत. विदर्भाच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या नागपुरातील सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यालयात सध्या सारे कसे शांत, शांत आहे.
निवडणुका जाहीर होण्याच्या दोन महिने आधीपासून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. युती, आघाडीच्या इच्छुकांनी त्यांना हव्या असलेल्या मतदारसंघांसाठी नेत्यांच्या भेटीगाठीही सुरू केल्या होत्या. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विदर्भातील विविध मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पक्ष कार्यालय सोडून रविभवनात घेतल्यामुळे पक्ष कार्यालयाकडे नेते फिरकले नाही. कुठल्या पक्षांनी किती जागा लढवायच्या आणि जागांच्या अदलाबदलीच्या मुद्यावरून भाजप-सेना महायुतीमध्ये आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीमध्ये अजूनही अनिश्चितता असल्यामुळे इच्छुक दावेदार संभ्रमात आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक जण मुंबई आणि दिल्लीला ठाण मांडून बसले आहेत.
एरवी निवडणुका घोषित होण्याच्या आधी पक्ष कार्यालयात वाढणारी कार्यकत्यार्ंची वर्दळ निवडणूक जाहीर झाली तरी दिसून येत नाही. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्षाचे शहर अध्यक्ष आणि काही पदाधिकारी इच्छुकांच्या रांगेत असल्यामुळे ते सध्या उमेदवारीसाठी धडपड करीत आहे. त्यामुळे त्यांचे पक्ष कार्यालयाकडे दुर्लक्ष आहे. पक्ष कार्यालयात होणाऱ्या बैठका कमी झाल्या आहे. भारतीय जनता पक्षाचे गणेशपेठमध्ये प्रचार कार्यालय असून त्या ठिकाणी कायकर्ते सोडा पण नेतेही दिसत नाही. अशीच परिस्थिती काँग्रेसचे कार्यालय असलेल्या देवडिया भवनात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बसस्थानकाजवळील कार्यालयात आहे. सायंकाळच्यावेळी बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते आणि एखाद दुसरा पदाधिकारी येत असतात. मात्र, प्रमुख नेते कार्यालयाकडे फिरकत नसल्याचे काँग्रेसच्या कार्यकत्यार्ंनी सांगितले.
भाजपचे टिळक पुतळा, धंतोली येथे कार्यालय असून गणेशपेठमध्ये निवडणूक प्रचार कार्यालय आहे. मात्र, या तीनही कार्यालयाऐवजी सध्या धरमपेठेतील बंगल्यावर आणि महालातील वाडय़ावरच इच्छुकांची आणि पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांंची गर्दी दिसून येते. त्यामुळे पक्षाची कार्यालये ओस पडली आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मुंबईत असल्यामुळे कार्यकर्ते कार्यालयात जाऊन उपयोग काय या मनस्थितीत असल्यामुळे ते फिरकत नाही. प्रचाराच्या दृष्टीने होणाऱ्या प्रमुख कार्यकत्यार्ंच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत नाही. शिवसेनेच्या रेशीमबागमधील कार्यालयात सायंकाळच्यावेळी काही निवडक कार्यकर्ते एकत्र येत असतात. मात्र, नेते नसल्यामुळे ते काही वेळ बसून कामाला लागतात. बहुजन समाज पक्षाच्या उत्तर नागपुरातील कार्यालयात शांतता आहे.
बसपने निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून ते महापालिकेच्या पक्ष कार्यालयात बैठक घेत असल्यामुळे कार्यालयाकडे बसपचे नेते फिरकत नाही. निवडणुका जाहीर झाल्यावर विविध राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांच्या मोर्चेबांधणीला वेग येईल, असा अंदाज होता. स्थानिक पातळीवर मात्र कुठेच असे चित्र नाही. सध्या राजकीय घडामोडी घडत आहेत.
मात्र, त्या सर्व पडद्याआड.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा