नगर व नाशिक जिल्ह्यांमधील धरणांतून जायकवाडीत पाणी सोडण्यासंदर्भात आपापल्या पक्षाची राज्यस्तरीय भूमिका जाहीर करावी, असे आवाहन मार्क्‍सवादी किसान सभेने सर्वच राजकीय पक्षांना केले आहे.
नगर व नाशिक जिल्ह्यांमध्ये तेथील धरणांमधून पाणी सोडण्यास विरोध करण्यासाठी आंदोलने करायची आणि आंदोलने करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पक्षांच्या नेत्यांनी मराठवाडय़ात मात्र पाणी परिषदा घेऊन भंडारदरा, निळवंडे, दारणा धरणाच्या पाण्यावर हक्क सांगणारे ठराव करुन जायकवाडीत पाणी सोडण्याची मागणी करावयाची या विविध पक्षांच्या संधीसाधू भूमिकेवर संघटनेने नेमकेपणाने बोट ठेवत राज्यव्यापी भूमिका घेण्याचे आवाहन सर्वच पक्षांना केले आहे.
निळवंडे धरणातून यापूर्वी अडीच टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात आले आता पुन्हा विविध धरणांतून पाणी सोडण्याचे नियोजन आहे. असे पाणी सोडण्याचा पायंडा पडला तर त्याचा नगर व नाशिकच्या शेतीवर अतिशय दूरगामी प्रतिकूल परिणाम होणार असल्याची भीती संघटनेने व्यक्त केली आहे. मराठवाडय़ाला पिण्याच्या पाण्याची नक्कीच गरज आहे, मात्र त्यासाठी जायकवाडीतील मृतसाठय़ाचा वापर केल्यास या प्रश्नाचा तिढा सुटू शकेल, शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळेल पाणी सोडण्याचा निर्णय अविवेकी असल्याची मार्क्‍सवादी किसान सभेची भूमिका असल्याचे पत्रकात प्रसिध्द केले आहे.
यासंदर्भात संघटनेचे राज्याध्यक्ष व्ही. पी. गावित, पक्षाचे नेते डॉ. अशोक ढवळे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. डॉ. अजित नवले, यादवराव नवले, सदाशिव साबळे आदी विविध कार्यकर्त्यांनी एका पत्रकाद्वारे किसान सभेची भूमिका स्पष्ट केली आहे.

Story img Loader