राजकीय पक्षांनी एकमेकांचे शत्रू असू नये, तर लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी एकत्र यावे, असे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे सांगितले.
बाजार समितीने बियाणे विक्रेत्यांना उपलब्ध करून दिलेल्या १४२ गाळ्यांचे उद्घाटन करताना ते बोलत होते. सभापती अर्जुनराव खोतकर अध्यक्षस्थानी होते. हा कार्यक्रम शासकीय स्वरूपाचा असल्याचे खोतकर यांनी प्रारंभीच सांगितल्याचा उल्लेख करून ठाकरे म्हणाले की, असे बोलायचे म्हणजे क्रिकेट सामन्यातील ‘मॅच फिक्सिंग’सारखे वाटते! कार्यक्रमास उपस्थित काँग्रेस, भाजप, रिपब्लिकन आदी पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले की, ज्यांच्यासाठी राज्य केले जाते, ती जनता खूश आहे की नाही हे पाहण्याची गरज आहे. जनतेसमोर अनेक प्रश्न आहेत. निवडणूक ३ महिन्यांवर आली असल्याने प्रचारात आरोप, शिवीगाळ होणारच. परंतु त्यानंतर जनतेचे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष दिले पाहिजे.
ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. या वेळी त्यांनी सोबत एका शेतकऱ्यासही मान दिला. या शेतकऱ्याचा त्यांनी सत्कार केला व आपल्या नावाशेजारी त्याचे नाव लावण्याची सूचनाही केली. खोतकर यांनी बाजार समितीने केलेल्या विकासकामांची माहिती दिली. महाराष्ट्र कृषी साहित्य उत्पादक व विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष अतुल लढ्ढा यांनी प्रारंभी मनोगत व्यक्त केले. खासदार अनिल देसाई, आमदार कैलास गोरंटय़ाल, जि. प. अध्यक्षा आशाताई भुतेकर, बियाणे उद्योजक पद्माकरराव मुळे, संतोष सांबरे, भास्करराव अंबेकर, ए. जे. बोराडे, लक्ष्मण वडले, शिवाजीराव चोथे, बबनराव लोणीकर आदी उपस्थित होते.
 झोंबणारी भगवी मिरची!
युतीच्या राजवटीत जालना दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना एका बियाणे उत्पादनाने विविध रंगांच्या मिरच्या त्यांना दाखविल्या. त्यावर जोशी यांनी यात भगव्या रंगाची मिरची नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. परंतु ते पुढच्या वर्षी दौऱ्यावर आले, तेव्हा या उद्योजकाने भगवी मिरची तयार केली होती, असा उल्लेख खोतकर यांनी प्रास्ताविकात केला. हा धागा पकडून भाषणात आदित्य ठाकरे म्हणाले की, भगवी मिरची तिखटही असते आणि ज्याला झोंबायचे त्याला झोंबतेही!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा