स्थान-मिनीमाता नगरलगतची वस्ती. वेळ दु. १. महिला व पुरुषांचा घोळका. दोन कार व मागून दुचाकीवर दोघे येतात. ‘बैठीए सब’, ‘सब कैसै बैठेंगे’ ‘और कार है’. दुचाकीवाला मोबाईलवर बोलतो. कारमध्ये महिला बसतात. तिसरी कार येते. घोळक्यातील एक पुरुष आळसावतो. ‘अरे क्या हुआ चाय पिना है या दारू मिलेगी’ दुचाकीवाला. आळसावलेला पुरुष कारमध्ये बसतो आणि घोळका मतदान केंद्राच्या दिशेने रवाना होतो. स्थान- संघर्ष नगर झोपडपट्टीसमोरील रस्ता, वेळ दु. साडेबारा. उभ्या सहा कारसमोर महिला-पुरुषांची गर्दी. कलकलाट. ‘अरे .. बूथवाले बैठो’ कार चालक ओरडतो. महिला धावतात. खच्चून भरलेली कार भांडेवाडीच्या दिशेने रवाना. दुसऱ्या कारसाठी ओरड. ‘अरे चिल्ला मत पुलीसवाले आयेंगे’ मध्येच एकजण बोलतो. ‘चिंता मत कर भाऊ देख लेगा’. खोळंबलेल्या रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीवरील तरुण चालकाला विचारतो ‘अरे ट्रॅफिक का जाम आहे’ ‘माहित नाही बस स्टॉप असेल’ दुचाकी चालक उच्चारतो. तेवढय़ात एक काळी व दोन-तीन कार येतात. ‘अरे रस्त्यावर गर्दी करू नका’ कारमधील कार्यकर्ता गर्दीतील लोकांना सांगतो, दोन-तीनजणांच्या कानात कुजबुजतो आणि या कार रवाना होतात.
स्थान- रामभाऊ म्हाळगी नगरमागील गजानन मंदिर चौक. वेळ- दु. १२. वाहनांची गर्दी. रस्त्याच्या कडेने राजकीय पक्षांचे बूथ व मतदारांची गर्दी. आधीच झालेल्या गर्दीत आणखी चार कार येतात आणि त्यातून महिलांचा जत्था उतरतो. त्यातील तिघी तेथे उभ्या दोघीेंना २५जणी असल्याचे सांगते. ‘एक नंबरचे बटन लक्षात ठेवा ग सर्वजणी’, एक महिला सांगते आणि हा जत्था मतदान केंद्राकडे रवाना होतो. डिप्टी सिग्नल, वाठोडा, मिनिमातानगर, वैशालीनगर, भिलगाव, शेंडेनगर, टेका नाका, इंदोरा, टाकळी, गोरेवाडा, जयताळा, ओंकारनगरसह सर्वच मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी सर्रास वाहनांतून मतदारांची ने-आण केली. निवडणूक आयोगाने निर्देश धाब्यावर बसवून सर्रास हा प्रकार सुरू असल्याचे आज शहरात दिसून आले.

Story img Loader