गुरुवारी घटस्थापनेपासून नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात होणार असून या कालावधीत भरविण्यात येणाऱ्या दांडीया रासच्या आयोजकांच्या तयार केलेले पोस्टर्सवर राजकीय नेत्यांचे फोटो उरण परिसरात लावण्यात आलेले होते. या पोस्टर्सवर विधानसभेतील इच्छुक उमेदवार तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो असल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याने उरणमधील नवरात्रोत्सव मंडळांचे बॅनर्स हटविण्यात आलेले आहेत. त्यामुळे दरवर्षी दांडीया रासनिमित्ताने पोस्टर्सवर झळकायला मिळणार नसल्याने अनेक राजकीय पोस्टर्स बॉइजचा भ्रमनिरास झाला आहे. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे बॅनर्सवर फोटो आढळल्यास कारवाईचे संकेत निवडणूक आचारसंहिता विभागाने दिले आहेत.
सध्या पारंपरिक नवरात्रीच्या जागरणासाठीच्या गरब्याची जागा आता दांडिया रासाने घेतली असून तरुणाईला आकर्षित करण्यासाठी अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी नवरात्रीच्या निमित्ताने डिजेच्या कर्कशात दांडिया साजरे करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा कार्यक्रमांना सिलेब्रेटींनाही आमंत्रित करून अधिक गर्दी खेचण्याचीही स्पर्धा सुरू झाली आहे.
या कालावधीत येणाऱ्या तरुण-तरुणांसमोर जाण्यासाठी राजकीय नेत्यांकडून मोठया प्रमाणात आपले खास करून विविध पोचमध्ये काढलेले फोटो परिसरात लावीत आहेत.
मात्र यावर्षीच्या नवरात्रोत्सवाच्या आधी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे उरण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक आचारसंहिता विभागाने विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो असलेले पोस्टर्स किंवा बॅनर्स लावलेले आढळल्यास त्यावर कारवाई करण्याचे संकेत दिलेले आहे. त्यामुळे उरण परिसरात लावण्यात आलेले राजकीय नेत्याचे बॅनर्स हटविण्यात आलेले आहेत.
या संदर्भात उरण विधानसभा मतदार संघाच्या आचारसंहिता विभागाच्या प्रमुखांना प्रतिक्रिया विचारली असता नाव न छापण्याच्या अटीवर अशा पोस्टर्सवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader